जोयडा : यल्लापूर वनपरिक्षेत्रात दोन घोरपडींची शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाने कारवाई करत पिता-पुत्राला अटक केली आहे. कन्निगेरी गावातील त्यांच्या घरातून दोन मृत नर घोरपडींसह शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या दोन तलवारी आणि एक कुऱ्हाड वनविभागाने ताब्यात घेतली.
यल्लापूर वनपरिक्षेत्रातील हळबाईल वनशाखेच्या अरळीकोप्पा गस्त क्षेत्रात, हळीयाळ क्रॉसजवळील कन्निगेरी गावात ही कारवाई करण्यात आली. घोरपडींची शिकार करून त्या घरात ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनकर्मचाऱ्यांनी संबंधित घरावर छापा टाकून तपासणी केली. यावेळी घरात दोन मृत नर घोरपडी आढळून आल्या.
तसेच शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या दोन तलवारी आणि एका कुऱ्हाडीचा वनविभागाने ताबा घेतला. या प्रकरणी इनास बस्त्यांव सिद्दी आणि त्याचा मुलगा प्रकाश इनास सिद्दी यांना अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. वन्यजीवांची शिकार व बेकायदेशीर साठवणुकीविरोधात वनविभागाकडून कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून करण्यात येत आहे.


