गोव्यातील १४ फुटबॉलपटूंचे मॅच फिक्सिंगमुळे ​निलंबन

गोवा फुटबॉल असोसिएशनने मॅच फिक्सिंग आणि फेरफारच्या आरोपांवरून १३ खेळाडू आणि एका पोलीस कॉन्स्टेबलसह १४ जणांना निलंबित केले असून, या प्रकरणाच्या सीबीआय तपासाची मागणी केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
29th September, 06:10 pm
गोव्यातील १४ फुटबॉलपटूंचे मॅच फिक्सिंगमुळे ​निलंबन

पणजी : गोव्यातील फुटबॉल स्पर्धांमध्ये मॅच फिक्सिंग (सामने निश्चिती) आणि फेरफार केल्याच्या आरोपांवरून गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) १४ जणांना निलंबित केले आहे. या कारवाईत १३ खेळाडू आणि एका माजी क्लब अधिकाऱ्याचा समावेश आहे. संबंधित अधिकारी सध्या गोवा पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. ‘जीएफए’च्या इंटिग्रिटी अधिकाऱ्यांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे देण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शापोरा युवक संघाचे अध्यक्ष प्रवीण दाभोळकर यांनी या गैरप्रकाराबाबत फुटबाॅल असोसिएशनकडे चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जीएफएचे ‘इंटिग्रिटी ऑफिसर’ संदेश टी. चोडणकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. संभाव्य मॅच फिक्सिंगसाठी एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला असतानाही, या १४ जणांनी त्याबाबतची माहिती जीएफएला दिली नाही, असा ठपका या चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.

प्रवीण दाभोळकर यांनी नऊ महिन्यांपूर्वी ही तक्रार दाखल केली होती, ज्यावर आता कारवाई झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यातील फुटबॉल स्पर्धांमध्ये ‘मॅच फिक्सिंग’चे आरोप केले जात होते. मात्र ठोस पुरावे समोर आल्यानंतरच आता प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील फुटबॉलची विश्वासार्हता, पारदर्शकता आणि ‘फेअर प्ले’ तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी असोसिएशन वचनबद्ध राहील, असे जीएफएचे अध्यक्ष डॉ. कायतान‍ फर्नांडिस यांनी सांगितले.

निलंबित करण्यात आलेले खेळाडू, अधिकारी

या प्रकरणात रोहन पेडणेकर, आकाश कुडणेकर, आकाश सनदी, भास्कर जल्मी, कृष्णनाथ शिरोडकर, विनायक राणे, चेतन दाभोलकर, सच्चिदानंद साटेलकर, अमन गोवेकर, मिनेश कुंकळकर, सतीश काणकोणकर, सूरज हडकोणकर, रोनाल्डो ऑलिव्हेरा आणि मौझान शेख (माजी क्लब अधिकारी आणि पोलीस कॉन्स्टेबल) या १४ जणांना निलंबित करण्यात आले आहे. शिस्तभंगाची कारवाई आणि पुढील तपास पूर्ण होईपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे

तक्रारदाराचे असोसिएशनकडून कौतुक

सहसा कोणीही आपल्याच संघातील चुका दाखवत नाही. मात्र, शापोरा युवक संघाचे अध्यक्ष प्रवीण दाभोलकर यांना त्यांच्या संघातील या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जीएफएला कळवले. अशा गैरप्रकारांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी उचललेल्या या धाडसी पावलाचे जीएफए कौतुक करते, असे जीएफएचे अध्यक्ष डॉ. कायतान फर्नांडिस यांनी सांगितले.

जीएफएचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस म्हणाले..

मॅच फिक्सिंग आणि सामन्यांमधील फेरफार हे फुटबॉलसाठी अत्यंत हानिकारक असून, अशा कारवाया अजिबात घडू नयेत.
सामन्यांमधील फेरफारसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही खेळाडूंना शिक्षित करत असून कार्यशाळाही घेत आहोत. मॅच फिक्सिंग प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जीएफएच्या कार्यकारी समितीने पुढील तपासासाठी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉन्स्टेबलची चौकशी करण्याची मागणी :

निलंबित माजी क्लब अधिकारी मौझान शेख हा गोवा पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे या प्रकरणातील त्याच्या कथित सहभागाबाबत पोलीस प्रशासनाने योग्य अधिकाऱ्याकडून प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी इंटिग्रिटी अधिकाऱ्यांनी केली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल मौझान शेख हा सध्या पोलीस खात्यात कार्यरत आहे. मॅच फिक्सिंग प्रकरणाबाबत खात्याअंतर्गत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- सुनीता सावंत, पोलीस अधीक्षक (क्रीडा) 





हेही वाचा
सर्व पहा