'गोवा काँग्रेस पार्टी'च्या नोंदणीबाबत ३० नोव्हेंबरपर्यंत निर्णयाचे न्यायालयाचे आदेश

'गोवा काँग्रेस पार्टी'ची अधिकृत नोंदणी झाली नसल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून, या पक्षाच्या नोंदणी अर्जावर ३० नोव्हेंबरपर्यंत योग्य निर्णय घेण्याचे आदेश गोवा उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
16 mins ago
'गोवा काँग्रेस पार्टी'च्या नोंदणीबाबत ३० नोव्हेंबरपर्यंत निर्णयाचे न्यायालयाचे आदेश

पणजी : 'गोवा काँग्रेस पार्टी' या नावाने सध्या तरी कोणत्याही राजकीय पक्षाची अधिकृत नोंदणी झालेली नाही, असे स्पष्टीकरण भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात दिले आहे. मागील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने या नावाचा पक्ष पूर्वी नोंदणीकृत आहे की नाही, याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते, त्यावर आयोगाने हे स्पष्टीकरण सादर केले. या प्रकरणातील निवडणूक आयोगाच्या संथ कार्यपद्धतीवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या नोंदणी अर्जावर आणि प्राप्त हरकतींवर ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम २९ (अ) अंतर्गत 'गोवा काँग्रेस पार्टी'च्या नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर करण्यात आला होता. या अर्जात पक्षाच्या अध्यक्षपदी वेळसाव येथील फ्रान्सिस्को अंतोनियो जासिंतो गोवेया, उपाध्यक्षपदी कासावली-मुरगाव येथील डायना गोवेया, तर सरचिटणीस म्हणून मये-डिचोली येथील वामन गावकर आणि सुकूर-बार्देश येथील रोहिदास गडेकर यांची नावे नमूद करण्यात आली होती. नियमानुसार निवडणूक आयोगाने या नोंदणीसंदर्भात सार्वजनिक जाहिरात प्रसिद्ध करून हरकती मागवल्या होत्या.   

या जाहिरातीनंतर गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आक्षेप घेत आयोगाकडे औपचारिक हरकत नोंदवली होती. मात्र, दाखल केलेल्या हरकतीवर निवडणूक आयोगाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने चोडणकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. काँग्रेस पक्षाच्या हरकतीवर योग्य ती सुनावणी घेऊन निर्णय झाल्याशिवाय 'गोवा काँग्रेस पार्टी'ला कोणतीही मान्यता किंवा नोंदणी देऊ नये, अशी प्रमुख मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, या याचिकेवरील पुढील सुनावणी मंगळवारी पार पडणार आहे. 

हेही वाचा
सर्व पहा