कुडचडे : ज्येष्ठ नागरिकासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना धमकावल्याप्रकरणी कुडचडे पोलीस स्थानकात तक्रार नोंद झालेले कुंभारजुवेच्या आमदाराचे पुत्र राहुल राजेश फळदेसाई यांनी पोलीस स्थानकात येऊन ज्येष्ठ नागरिकाची माफी मागितली.
यावेळी तक्रारदार ज्येष्ठ नागरिकही पोलीस ठाण्यात उपस्थित होते. राहुल फळदेसाई यांनी त्यांच्याकडे माफी मागितल्यानंतर तक्रारदाराने त्यांची माफी स्वीकारली.
रस्त्यावर वाहन पार्क केल्यावरून वाद झाल्यानंतर कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांचा मुलगा राहुल फळदेसाई आणि त्याच्या तीन साथीदारांनी ज्येष्ठ नागरिकासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना धमकावल्याप्रकरणी कुडचडे पोलीस स्थानकात तक्रार नोंद झाली होती. त्यानंतर कुडचडे पोलिसांनी तपास सुरू करून राहुल फळदेसाई याला नोटीस पाठवून आज मंगळवारी चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलावले होते. त्यानुसार राहुल फळदेसाई आज मंगळवारी कुडचडे पोलीस स्थानकात गेले व त्यांनी माफी मागितली.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, कुडचडे येथील ज्येष्ठ नागरिक तथा वकील शांताराम कुडचडकर २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता मडगावच्या दिशेने जात होते. त्यावेळी कुडचडे येथील पंटेमळ जंक्शनजवळ एक थार जीप रस्त्यावर पार्क केली होती. त्यामुुळे इतर वाहनांना जाण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे अॅड. कुडचडकर यांनी हॉर्न वाजवून थार बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी त्या गाडीत असलेल्या युवकाने तक्रारदारांना शिवीगाळ केली व तो आपल्या गाडीत जाऊन बसला.
गाडी रस्त्यावरून न हटवता तशीच ठेवल्याने तक्रारदाराने त्याच्या गाडीजवळ जाऊन गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी संशयित राहुल फळदेसाई आणि त्याच्या तीन साथीदारांनी तक्रारदाराला शिवीगाळ करत धमकावले. त्यानंतर तक्रारदाराचे वाहन पुढे गेल्यानंतर संशयितांनी आपल्या वाहनातून शिवाजी चौक ते आंबेडकर चौकापर्यंत तक्रारदाराच्या वाहनाचा पाठलाग केला. संशयितांनी वाहनातील सदस्यांना अश्लील शिवीगाळ करून धमकावण्याचा आणि वाहनावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


