पणजी : म. गांधींच्या जयंती निमित्त २ ऑक्टोबर रोजी फोंडा तालुक्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान शेतकरी व महिलांना संबोधित करणार आहेत. कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार असल्याची माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
बुधवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कृषी खात्याचे संचालक चंद्रहास देसाई, सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना उपस्थित होते. शिरोडकर यांनी सांगितले की, हा कार्यक्रम सन ग्रेस सभागृहात सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधतील. केंद्राने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध योजना, उपक्रमांची माहिती देतील. या कार्यक्रमास ऑनलाईन पद्धतीने गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी. राज्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबवत आहे.
कृषी, डेअरी, मत्स्योद्योग अशा क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करून प्रगती करणे आवश्यक आहे. तरुणांनी या क्षेत्रात करिअर करावे. राज्य सरकारतर्फे सुरू असलेल्या विविध अनुदान योजनांचा लाभ घ्यावा.
ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार अंत्योदय तत्त्वावर चालत आहे. विकासाचा फायदा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. केंद्राच्या किसान सन्मान योजनेद्वारे सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येत आहेत.
‘हर घर जल’, आवास योजनेचा कोट्यवधी लोकांना फायदा झाला आहे. राज्य सरकारतर्फे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या गोवा उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख महिलांना तीन हजार रुपये देण्यात आले आहेत. ही योजना पुढील आर्थिक वर्षात देखील सुरू राहणार आहे.
‘गोवा फ्रेश’ योजनेचे अनावरण
कृषी संचालक देसाई यांनी सांगितले की, २ ऑक्टोबर रोजी शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते ‘गोवा फ्रेश’ योजनेचे उद्घाटन केले जाईल. या योजनेत स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उत्पादनांचे ब्रँडीग, पॅकेजिंग केले जाईल. यामुळे ग्राहकांना अस्सल आणि चांगल्या दर्जाच्या गोमंतकीय कृषी उत्पादनांची माहिती मिळेल. योजनेतून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.


