'एआय-स्मार्ट' शेती आणि 'गोवा फ्रेश' ब्रँडद्वारे कृषी क्षेत्राला लाभेल नवी दिशा : मंत्री फळदेसाई

नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी परिषदेत गोव्याने AI-सक्षम शेती, 'गोवा फ्रेश' ब्रँड, काजू-नारळ मंडळ आणि कुळ शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेची मागणी करत आधुनिक व आत्मनिर्भर कृषी विकासाचा रोडमॅप सादर केला.गोव्यातर्फे समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई या परिषदेला उपस्थित होते.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
'एआय-स्मार्ट' शेती आणि 'गोवा फ्रेश' ब्रँडद्वारे कृषी क्षेत्राला लाभेल नवी दिशा : मंत्री फळदेसाई

नवी दिल्ली : येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राष्ट्रीय कृषी परिषदेत गोव्यातर्फे समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी राज्याची प्रगती, नाविन्यपूर्ण योजना आणि भविष्यातील आव्हाने अत्यंत प्रभावीपणे मांडली. 'स्वयंपूर्ण गोवा' ही संकल्पना केंद्र सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' अभियानाच्या धर्तीवर गोव्यात प्रभावीपणे राबवली जात असल्याचे सांगत, त्यांनी राज्यातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती अधिक फायदेशीर आणि आकर्षक बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.

गोव्यासारख्या पर्यटनप्रधान आणि वेगाने प्रगती करणाऱ्या राज्यात शेतमजुरांची टंचाई ही एक प्रमुख समस्या बनली आहे. यावर मात करण्यासाठी राज्य सरकार यांत्रिकीकरणावर भर देत असून 'फार्म मशिनरी अँड कस्टम हायरिंग सेंटर्स'च्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि वेळ वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय पडिक जमिनी पुन्हा लागवडीखाली आणून तरुणांना आधुनिक शेतीकडे आकर्षित करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत.

या परिषदेत गोव्याने सादर केलेल्या देशातील पहिल्या 'एआय-सक्षम' एकात्मिक कृषी इंटेलिजन्स प्रणालीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही प्रणाली मातीचे आरोग्य, हवामानाचा अंदाज, पिकांची निवड, बाजारातील किमती आणि लॉजिस्टिक या सर्व घटकांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणार आहे. शेतीतील पारंपरिक पद्धतींना कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) जोड देऊन काय पिकवायचे आणि कुठे विकायचे याबद्दल अचूक निर्णय घेण्यास यामुळे शेतकऱ्यांना मदत होणार आहे. हे प्रात्यक्षिक मॉडेल यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशातील इतर राज्यांसोबत ते शेअर करण्याची तयारीही गोव्याने दर्शवली आहे. याशिवाय, गोव्यात प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावावर केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी मंत्री फळदेसाई यांनी केली.

स्थानिक उत्पादनांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी 'गोवा फ्रेश' हा नवा ब्रँड सुरू केला जात असून, काजू आणि नारळ उत्पादकांसाठी 'काजू व नारळ मंडळ' स्थापन केले जात आहे. या सर्व उपक्रमांचे औपचारिक उद्घाटन २ ऑक्टोबर रोजी (गांधी जयंतीच्या दिवशी) केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या गोवा दौऱ्यादरम्यान होणार असल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या उपक्रमांचे स्वागत करत २ ऑक्टोबरच्या दौऱ्यात सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.


हेही वाचा
सर्व पहा
महत्वाच्या बातम्या
सर्व पहा