मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १५ लाखांची नुकसान भरपाई देऊ; उच्च न्यायालयात लुथरा बंधु, गुप्ताचा प्रस्ताव

हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईटक्लब आग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तयारी मालकांनी दर्शवली असून, यावर उच्च न्यायालय पुढील सुनावणीत निर्णय घेणार आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १५ लाखांची नुकसान भरपाई देऊ; उच्च न्यायालयात लुथरा बंधु, गुप्ताचा  प्रस्ताव

पणजी :  हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईटक्लबमध्ये ६ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या भीषण दुर्घटनेतील २५ मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तयारी क्लबच्या मालकांनी दर्शवली आहे. क्लबचे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि व्यावसायिक भागीदार अजय गुप्ता यांच्या वतीने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 


उच्च न्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान क्लबच्या मालकांनी ही ऑफर सादर केली असली, तरी दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या ६ जणांच्या भरपाईबाबत अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.  क्लबचे मालकांनी दिलेली ही १५ लाख रुपयांची रक्कमेवर पुढील सुनावणी दरम्यान निर्णय घेण्यात घेईल अशी माहिती ॲड. जनरल देविदास पांगम यांनी दिली.

हडफडे येथील बर्च क्लबला ६ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले होते. या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन प्रथम अॅड. रोहित ब्राझ डिसा यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर अॅड. तेरेंस सिक्वेरा यांची नियुक्ती केली. या प्रकरणी न्यायालयाने किनारी भागातील काही पंचायत तसेच इतर यंत्रणांना प्रतिवादी करून नोटीस जारी केली होती. त्यात त्यांना किती जणांना व्यावसायिक परवाना तसेच ना हरकत दाखला जारी केल्याची माहिती देण्यास सांगितले होते. दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी यावर न्यायालयाने भर दिला.

हेही वाचा
सर्व पहा
महत्वाच्या बातम्या
सर्व पहा