म्हापसा उपनदीतील २.१ किलोमीटर क्षेत्रातील गाळ काढण्याचा प्रस्ताव

मयडे आणि उसकई परिसरातील म्हापसा उपनदीतील २.१ किलोमीटर क्षेत्रातील गाळ काढण्याचा प्रस्ताव बंदर कप्तान विभागाने ठेवला असून, प्रत्यक्ष कामापूर्वी ९० दिवसांचा पर्यावरणीय अभ्यास केला जाणार आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
4 hours ago
म्हापसा उपनदीतील २.१ किलोमीटर क्षेत्रातील गाळ काढण्याचा प्रस्ताव

पणजी: मयडे येथे म्हापसा नदीच्या उपनदीतील २.१ किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील गाळ काढण्याचे काम बंदर कप्तान  खात्याने प्रस्तावित केले आहे. सखल भागातील शेतात पावसाचे पाणी घुसून पिकांचे नुकसान होऊ नये आणि ओहोटीच्या  वेळी स्थानिक मच्छीमारांना नदीत होड्या चालवताना येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात, हा या कामाचा उद्देश आहे.

बंदर कप्तान खात्याने बुधवारी निविदा प्रसिद्ध करून मयडे आणि उसकई गावातील म्हापसा नदीचा १५ मीटर रुंद आणि २ मीटर खोलपर्यंतचा गाळ काढण्याचे नियोजन केले आहे. प्रत्यक्ष गाळ काढण्याचे काम सुरू करण्यापूर्वी संबंधित क्षेत्राचा 'जलद पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन' (REIA - Rapid Environmental Impact Assessment) अभ्यास करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या अभ्यासाद्वारे प्रस्तावित कामाचा पर्यावरणावर होणारा संभाव्य परिणाम तपासला जाईल.

आरईआयए (REIA) अभ्यासात प्रस्तावित गाळ काढण्याच्या जागेच्या तसेच त्याच्या १० किलोमीटर त्रिज्येमध्ये येणाऱ्या क्षेत्रातील पाण्याच्या आणि गाळाच्या भौतिक-रासायनिक गुणधर्मांची तपासणी केली जाईल. म्हापसा नदीतील 'फायटोप्लँक्टन', 'झूप्लँक्टन' आणि नदीच्या तळाशी राहणाऱ्या जीवांची संख्या, जैवभार (बायोमास) आणि विविधतेचाही अभ्यास केला जाणार आहे.

नदीच्या निवडक भागांतील माशांची विविधता आणि प्रमाण यांचेही सविस्तर मूल्यांकन केले जाईल. गाळ काढण्याच्या कामाचा आणि त्याशी संबंधित उपक्रमांचा नदीच्या परिसंस्थेवर होणारा परिणाम तपासण्यासाठी भौतिक आणि जलगतिकीय (हायड्रोडायनामिक) मॉडेलिंग केले जाणार आहे. या अभ्यासात नदीचा प्रवाह, भरती-ओहोटीमुळे पाण्याच्या पातळीत होणारे बदल आणि गाळाच्या कणांच्या आकाराचा अभ्यास समाविष्ट असेल. तसेच मॅंग्रोव्हज, गवताळ भाग, पाण्यातील वनस्पती, प्रवाळ आणि संबंधित जीवसृष्टीवर गाळ काढण्याच्या कामामुळे होणाऱ्या परिणामांची तपासणी केली जाईल.

तसेच निरीक्षणाच्या वेळापत्रकाचा समावेश असलेला एक सर्वसमावेशक 'पर्यावरण व्यवस्थापन आराखडा' तयार केला जाईल. प्रस्तावित गाळ काढण्याच्या कामामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांचे मूल्यांकन करून त्यावर योग्य उपायांची शिफारस आरईआयए अहवालात केली जाईल.

हा अहवाल केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या 'पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अधिसूचना, २००६' च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केला जाईल. हा अभ्यास पूर्ण करण्याचा कालावधी कामाचा आदेश जारी केल्याच्या तारखेपासून ९० दिवसांचा असेल.

हेही वाचा
सर्व पहा
महत्वाच्या बातम्या
सर्व पहा