भेंडीच्या उत्पादनाची माहिती देताना शेतकरी विश्वंभर गावस. सोबत कृषी अधिकारी यशवंत गावस व इतर.
गोवन वार्ता वार्ताहर
साखळी
साखळी मतदारसंघातील मायणा न्हावेली येथील प्रगत शेतकरी विश्वंभर गावस यांनी शेतात शेवगा व भेंडी यांची एकत्रित लागवड करून पीक घेण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. या पिकांमधून त्यांना एक लाख रुपयांहून अधिक नफा झाला आहे.
विश्वंभर गावस यांनी आपल्या एक एकर शेतात शेवग्याची झाडे लावली होती. त्यातच अंतर्गत लागवड म्हणून भेंडीचे रोपे लावली होती. लागवडीनंतर ८० ते ८५ दिवसांनंतर भेंडीचे पहिले पीक मिळाले. शेवग्याच्या झाडांना शंभर दिवस होताच त्यांच्या मुख्य फांद्या कापण्यात आल्या. त्यातून झाडांना नवीन फांद्या आल्या आहेत. त्या फांद्यांवर आता फुलधारणा व शेवग्याच्या शेंगा लागू लागल्या आहेत.
भेंडीचे पहिले पीक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाले. सुमारे अडीच टन भेंडीचे उत्पादन झाले. त्यातून सुमारे १ लाख २० हजार रुपयांचा नफा झाला. शेवग्याच्या झाडांचा पाला चतुर्थी काळात विक्रीसाठी बाजारात आणला. काही पानांची पावडर बनवून ‘मोरींगो पावडर’ म्हणून औषधी उत्पादन बाजारात आणले. मोरींगो पावडरला देश-विदेेेशांत मोठी मागणी आहे. त्यामुळे नवीन प्रायोगिक तत्त्वावरील लागवडीचा तिहेरी लाभ शेतकरी घेऊ शकतात, असे विश्वंभर गावस यांनी सांगितले.
कृषी खात्याच्या योजनांचा लाभ घ्या : यशवंत गावस
न्हावेली येथे विश्वंभर गावस यांनी केलेल्या नवीन प्रयोगाला चांगले फळ मिळाले आहे. शेवग्याची रोपे तीन मीटर अंतरावर, तर ९० सेंटीमीटर अंतरावर भेंडीची रोपे लावण्यात आली होती. नवीन भेंडीही यायला सुरुवात झाली आहे. शेवग्याच्या झाडांनाही फुले येऊन लवकरच शेंगाही लागणार आहेत. त्यामुळे दोन्ही लागवडीतून पीक व नफा मिळण्यास सुरुवात होणार आहे. कृषी खाते शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डिचोलीचे विभागीय कृषी अधिकारी यशवंत गावस यांनी सांगितले.
‘वनराई’चे सहकार्य
शेतकामात वेदांत कंपनीच्या सामाजिक जबाबदारीतून ‘वनराई’ ग्राम निर्माण प्रकल्पअंतर्गत शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य केले जात आहे. विशेषतः आमोणा, न्हावेली भागातील शेतकऱ्यांना वनराईचे सहकार्य लाभते, असे वनराईचे प्रतिनिधी परशुराम गावकर यांनी सांगितले.


