पणजी : राज्यात यंदा पावसाचे प्रमाण काहीसे कमी असले तरी पाण्यासंदर्भात घाबरून जाण्याची कोणतीही गरज नाही. जलस्रोत खाते व पेयजल खात्याकडून पाण्याचे योग्य नियोजन केले जात असून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पेयजल मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले आहे. मडगाव येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील पाणीपुरवठा, राजकीय घडामोडी आणि आगामी विधानसभा निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले.
मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, सध्या राज्यात जलसाठे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून योग्य नियोजनाद्वारे पुढील वर्षी मे आणि जून महिन्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येऊ शकतो. पाणी साठवणुकीच्या आणि संवर्धनाच्या आवश्यक त्या उपाययोजना आधीच सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या महिनाभरात पावसाचे प्रमाण कसे राहते यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. आणखी २० इंच पाऊस पडल्यास चिंतेचे कोणतेही कारण राहणार नाही. साळावली धरणाचा ओव्हरफ्लो अजूनही सुरू असून दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबरपर्यंत तो कायम राहिल्यास दक्षिण गोव्यातील पाणीपुरवठा अत्यंत सुरळीत राहील. याशिवाय खाणीच्या खंदकातील पाणी शुद्ध करून ते पुन्हा उपयोगात आणण्याचा विचार सुरू असून जलस्रोत खात्याकडून बंधाऱ्यांवर प्लेट घालण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल.
गेल्या अनेक वर्षांत राज्यात पाण्याची टंचाई कधीही भासलेली नाही, असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, राज्यातील ९६ टक्के पाणीपुरवठा हा धरणे आणि मोठ्या जलसाठ्यांमधून होतो, तर छोट्या जलस्रोतांचा वाटा केवळ ४ टक्के आहे. त्यामुळे छोटे जलस्रोत बंद पडले तरी मोठा फरक पडणार नाही. गरजेनुसार सरकारकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल आणि वेळोवेळी आवश्यक नियमावली जारी केली जाईल.
दरम्यान, राजकीय प्रश्नांवर बोलताना मंत्री फळदेसाई यांनी एसटी आरक्षणाच्या प्रक्रियेवर भाष्य केले. सांगे मतदारसंघ आरक्षित झाल्यास पक्षाच्या सूचनेनुसार आपण काम करू, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष सांगेल त्या ठिकाणाहून आपण निवडणूक लढवण्यास तयार आहोत, कारण आपण केवळ आमदार होण्यासाठी नाही तर लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी तुयेकर यांच्या जनसंपर्कामुळे व सर्वांशी असलेल्या चांगल्या वागणुकीमुळे ते पुन्हा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.


