प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्षपदाचा ताबा प्रदीप सरमोकादम यांच्याकडे

आरोग्य संचालनालयाच्या संचालक डॉ. मेधा साळकर यांच्या निवृत्तीनंतर उपसंचालक डॉ. सलिना नाईक यांच्याकडे संचालकपदाचा ताबा देण्यात आला आहे.

Story: गोवन वार्ता प्रतिनिधी |
01st October, 11:59 pm
प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्षपदाचा ताबा प्रदीप सरमोकादम यांच्याकडे


पणजी : गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम यांच्याकडे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदाचा ताबा देण्यात आला आहे. डॉ. लेविन्सन मार्टिन (आयएएस) हे निवृत्त झाल्याने सरमोकादम यांच्याकडे पदाचा ताबा सोपविण्यात आला आहे. दरम्यान, आरोग्य संचालनालयाच्या संचालक डॉ. मेधा साळकर यांच्या निवृत्तीनंतर उपसंचालक डॉ. सलिना नाईक यांच्याकडे संचालकपदाचा ताबा देण्यात आला आहे.

जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव या नात्याने प्रदीप सरमोकादम यांनी मिठागरांचे संवर्धन तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. राज्याचे कृषी धोरण तयार करण्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सप्टेंबर महिना अखेरीस महत्त्वाच्या खात्यांच्या तीन प्रमुखांचा कार्यकाळ समाप्त झाला. शिक्षण संचालक शैलेश झिंंगडे हे निवृत्त झाल्याने शिक्षण संचालकपदाचा ताबा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांच्याकडे देण्यात आला. यानंतर प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष डॉ. लेविन्सन मार्टिन निवृत्त झाल्याने प्रदीप सरमोकादम यांच्याकडे अध्यक्षपदाचा ताबा देण्यात आला.

आरोग्य संचालक डॉ. मेधा साळकर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर उपसंचालक डॉ. सलिना नाईक यांच्याकडे संचालकपदाचा ताबा देण्यात आला आहे. डॉ. रूपा नाईक या ३१ जुलै रोजी निवृत्त झाल्यानंतर डॉ. मेधा साळकर यांच्याकडे संचालकपदाचा ताबा देण्यात आला होता. 

हेही वाचा
सर्व पहा