पणजी : गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या आंदोलनावर जोरदार घणाघात केला. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीकडून २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान मतदार याद्या आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात ‘लोकशाही वाचवा’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा समाचार घेताना चौहान यांनी, हा काँग्रेसचा एक नवीन बनाव असून ही मोहीम प्रत्यक्षात लोकशाही वाचवण्यासाठी नसून स्वतःच्या पक्षातील घराणेशाही आणि कुटुंबाचे अस्तित्व वाचवण्यासाठी काढलेली 'घराणेशाही वाचवा यात्रा' आहे, असा आरोप केला.
काँग्रेस पक्ष देशभरात भ्रम, अफवा आणि अराजकता पसरवण्याचे काम करत असून परदेशात जाऊन आपल्याच देशाची नाहक अपकीर्ती करत असल्याचे ते म्हणाले. देशातील मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेचे समर्थन करताना शिवराजसिंह चौहान यांनी मतदार यादीला लोकशाहीचा आत्मा असे संबोधले. ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, ज्यांची नावे दोन-दोन ठिकाणी नोंदवली गेली आहेत किंवा ज्या व्यक्ती भारताच्या नागरिक नाहीत, अशांची नावे मतदार यादीत कशासाठी हवीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
निवडणूक आयोग जेव्हा मतदार यादी स्वच्छ आणि पारदर्शक करण्याचे काम हाती घेतो, तेव्हा काँग्रेस पक्ष त्यालाच विरोध दर्शवतो, यावरून त्यांची नियत स्पष्ट होते असे ते म्हणाले. काँग्रेसच्या भूतकाळातील कारभारावर बोट ठेवताना त्यांनी आठवण करून दिली की, काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशात आणीबाणी लादली, ५० हून अधिक वेळा निवडून आलेली राज्य सरकारे बरखास्त केली आणि अनेकदा मुख्यमंत्री बदलून लोकशाही मूल्यांचा संकोच केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर टीका करताना चौहान यांनी दावा केला की, त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने केंद्र आणि राज्यांमधील मिळून तब्बल ९९ निवडणुका गमावल्या आहेत.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा संदर्भ देताना ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस संघटना बरखास्त करून तिचे रूपांतर 'लोक सेवक संघात' करावे, असा प्रस्ताव जानेवारी १९४८ मध्ये महात्मा गांधींनी तयार केला होता. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी गांधीजींचा हा प्रस्ताव नाकारला होता, परंतु आज राहुल गांधी हे महात्मा गांधीजींचे ते विधान खरे ठरवत असून काँग्रेसचा अंत जवळ आणत आहेत. आता जनताच काँग्रेस पक्षाचे विसर्जन करेल असा दावा त्यांनी केला. याशिवाय गोव्यातील काँग्रेसवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, प्रदेश काँग्रेसमधील तीव्र अंतर्गत गटबाजी आणि मतभेदांमुळे उद्विग्न होऊन पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत.
दरम्यान केंद्रीय मंत्री चौहान यांनी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रशासकीय कार्याचे भरभरून कौतुक केले. गोवा सरकार सर्व कल्याणकारी आणि विकास योजना सर्वसामान्य जनतेच्या थेट दारापर्यंत पोहोचवण्याचे उत्कृष्ट काम करत असून गोवा हे 'विकसित भारत' संकल्पनेचे एक आदर्श मॉडेल म्हणून समोर येत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भाषणाच्या शेवटी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस नम्र अभिवादन केले. गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी स्वच्छता मोहीम अधिक तीव्र गतीने आणि नव्या उत्साहाने पुढे नेली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


