पाण्याचा वापर जपून करा,घाबरण्याची गरज नाही!

मंत्री फळदेसाई : जलस्रोत, पेयजल खात्यांकडून पाण्याचे नियोजन

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
01st October, 11:27 pm
पाण्याचा वापर जपून करा,घाबरण्याची गरज नाही!

मडगाव : यंदा पावसाचे प्रमाण काहीसे कमी असले तरी राज्यात पाण्याची चिंता करण्याची गरज नाही. त्यासाठी नागरिकांनी घाबरू नये. जलस्रोत आणि पेयजल खात्याकडून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले जात असून, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जलस्रोत मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले. आवश्यकतेनुसार पाण्याच्या वापराबाबत नियमावली आणि सूचना जारी केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.मडगाव येथील कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फळदेसाई म्हणाले की, सध्या राज्यातील जलसाठे मुबलक आहेत. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पुढील वर्षी मे-जूनपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येईल. पाणी साठवणूक आणि संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, पुढील महिनाभरातील कालावधीत पावसाचे प्रमाण कसे राहणार यावर लक्ष ठेवले जात आहे.
आणखी २० इंच पाऊस झाल्यास पाण्याबाबत घाबरण्याची स्थिती राहणार नाही. साळावली धरणाचा ओव्हरफ्लो अद्याप सुरू असून, दरवर्षीप्रमाणे तो नोव्हेंबर महिन्यापर्यंत कायम राहिल्यास दक्षिण गोव्यातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यास मदत होईल, असे फळदेसाई यांनी सांगितले.
खाणीतील पाण्याच्या पुनर्वापराचा विचार
छोट्या जलस्रोतांमधील पाणी कसे राखून ठेवता येईल, यावर विचार सुरू आहे. खाणीच्या खंदकातील पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुन्हा वापर करता येईल का, याचाही अभ्यास केला जात आहे. जलस्रोत खात्याकडून बंधाऱ्यांवरील प्लेट बसविण्याचे कामही लवकर हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धरणांमधून ९६ टक्के पाणीपुरवठा
राज्यात आतापर्यंत पाण्याची गंभीर कमतरता भासलेली नाही. राज्यातील सुमारे ९६ टक्के पाणीपुरवठा धरणे आणि मोठ्या जलसाठ्यांमधून होतो, तर छोट्या जलस्रोतांचा वाटा केवळ ४ टक्के आहे. त्यामुळे काही छोटे जलस्रोत बंद पडले तरी पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार नाही, असा दावा फळदेसाई यांनी केला.
गेल्यावर्षी टँकरमुक्त गाव योजना राबवण्यात आली होती. यंदा काही गावांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र, नागरिकांनी पाण्याचा वापर करताना स्वतःवर काही बंधने घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पक्ष सांगेल तिथून निवडणूक लढवणार
एसटी आरक्षणाची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू आहे. सांगे मतदारसंघ आरक्षित झाल्यास पक्षाच्या सूचनेनुसार काम करणार असून, अन्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितल्यास तेथेही निवडणूक लढवण्याची तयारी आहे. आपण केवळ आमदार होण्यासाठी राजकारणात नसून लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहोत, असे फळदेसाई यांनी सांगितले.
जनसंपर्क, वागणुकीमुळे तुयेकर पुन्हा निवडून येतील
नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी चांगले काम केले असून, कोणताही भेदभाव न करता केलेल्या कामामुळे ते सर्वांशी चांगले संबंध ठेवून आहेत. त्यांच्या आदरयुक्त वागणुकीमुळे आणि जनसंपर्कामुळे ते आमदार झाले आहेत. त्यांना पुन्हा आमदार होण्यासाठी कोणत्याही परिस्थितीवर अवलंबून राहण्याची गरज नाही, असे सांगत तुयेकर पुन्हा निवडून येतील, असा विश्वास फळदेसाई यांनी व्यक्त केला.             

हेही वाचा
सर्व पहा