पणजी : शाळांतील शिक्षकांसाठी डिजिटल अध्यापनासाठी सुविधा पुरवण्याच्या दिशेने सरकार सकारात्मक आहे. त्याच अनुषंगाने शिक्षकांसाठी ५,१०० टॅबलेट खरेदी करण्यासाठी सरकारने निविदा जारी केली आहे. टॅबलेटमध्ये की बोर्डसह शिक्षण संचालनालयाशी संबंधित आवश्यक ॲप्लिकेशन्स आणि शैक्षणिक सामग्री इत्यादी पुरवली जाणार आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत उपक्रम हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सरकारने माहिती तंत्रज्ञान विभागाशी संबंधित इन्फोटेक कॉर्पेरेशन, गोवा मार्फत टॅबलेट खरेदी करण्यासाठी निविदा जारी केली आहे. निविदेनुसार, ११ इंच आकाराचे ५,१०० टॅबलेट खरेदी करण्यात येणार आहेत. त्यातील ५ हजार टॅबलेटमध्ये १२८ जीबी स्टोरेज, तर उर्वरित १०० टॅबलेटमध्ये २५६ जीबी स्टोरेज असणार आहे. सर्व उपकरणांमध्ये ८ जीबी रॅम आणि की बोर्डची सुविधा असणार आहे.
निविदा प्रक्रियेसाठी १२ ऑक्टोबर अंतिम मदत
१२ ऑक्टोबर पर्यंत निविदा प्रक्रियेसाठी अंतिम मुदत असणार आहे. प्रकल्पाच्या आराखड्यानुसार सर्व टॅबलेट १५ ऑक्टोबरपर्यंत वापरासाठी तयार करण्याचे नियोजन आहे. डिजिटल टूलकिटमुळे शिक्षकांना शैक्षणिक सामग्री, डिजिटल अॅप्लिकेशन्स आणि इतर अध्यापन साधनांचा वापर अधिक सुलभपणे करता येणार आहे. टॅबलेटचे केंद्रीकृत व्यवस्थापन असल्याने शैक्षणिक सामग्रीमध्ये आवश्यक बदल आणि अपडेट एकाच ठिकाणाहून करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.


