पणजी: गोव्यातील नारळ आणि काजूच्या पिकांचा दर्जा सुधारण्यासोबतच त्यांचे एकंदरीत उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रीय कृषी अधिकारी लवकरच गोव्याचा दौरा करणार आहेत. हे अधिकारी येथील स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित शेती पद्धतींचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. 'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमाच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'सेवा संकल्प अभियाना'दरम्यान ते बोलत होते.
या राज्यस्तरीय सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासह अनेक मंत्री आणि आमदार प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात 'गोवा ब्रँड'चे औपचारिक अनावरण करण्यात आले. यासोबतच राज्यातील हजारो महिला आणि शेतकरी लाभार्थ्यांना सुमारे ८० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.
आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, गोव्यातील नारळाची झाडे जुनी झाल्यामुळे त्यांचे उत्पादन घटत चालले आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारतर्फे लवकरच विशेष 'नारळ संवर्धन योजना' सुरू केली जाणार आहे. या योजनेद्वारे देशभरातील नारळ उत्पादन आणि त्याचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. याअंतर्गत जुनी व कमी उत्पादन देणारी झाडे काढून त्या जागी नवीन पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. केंद्राच्या विविध योजनांचा गोव्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असून, पुढेही कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारला आवश्यक असणारा सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यासोबतच कुशावती जिल्ह्यात लवकरच एक आधुनिक कृषी विज्ञान केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
कोविडच्या काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर 'आत्मनिर्भर भारत' हे ध्येय ठेवले होते. त्याच पार्श्वभूमीवर गोवा सरकारने 'स्वयंपूर्ण गोवा' हा उपक्रम राबवून राज्यात प्रगती साधली आहे. आज गोवा भाजीपाला व इतर उत्पादनांमध्ये स्वयंपूर्ण होत आहे. देशातील इतर राज्यांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी गोव्याच्या या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन चौहान यांनी केले. तसेच मोपा विमानतळ आणि जुवारी पुलासारख्या प्रकल्पांमुळे गोव्यात पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे.
या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गेल्या सहा वर्षांत गोवा विविध क्षेत्रात स्वावलंबी झाला आहे. पूर्वी गोव्याला भाजीपाल्यासाठी बेळगाववर अवलंबून राहावे लागत होते, परंतु आज परिस्थिती बदलली असून गोव्यातील भाजी बेळगावमध्ये निर्यात केली जात आहे. शेतकऱ्यांच्या मालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मोपा विमानतळावर लवकरच अत्याधुनिक वेअरहाऊस सुरू करण्यात येणार आहे, ज्यामुळे गोव्यातील भाजीपाला जगभरात निर्यात करणे शक्य होईल.
दरम्यान, केंद्र सरकारने नुकतेच युरोपीय युनियन आणि ओमान या देशांसोबत महत्त्वाचे व्यापारी करार केले आहेत. या करारानुसार भारतातून या देशांमध्ये नारळ आणि काजूच्या निर्यातीवर शून्य टक्के निर्यात कर लागू करण्यात आला आहे. गोव्यातील शेतकऱ्यांनी या करसवलतीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहनही केंद्रीय मंत्री चौहान यांनी केले.


