वास्को : भरधाव वेगाने दुुचाकी चालवल्यानेच बायणा येथे उड्डाणपुलावर जीवघेणा अपघात घडला असून, त्यात दोघांचा मृत्यू झाला. अपघात घडला त्यावेळी उड्डाणपुलाखालून आणखी कुणी जात असता तर त्याचाही बळी गेला असता. भरधाव वाहने चालवून आणि नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवून अपघात घडल्यास त्याला सरकार काय करणार? असा प्रश्न वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी केला.
अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. एआय आधारित वाहतूक सिग्नल बसवून किंवा इतर उपाययोजना करून हा प्रश्न सुटणार नाही. तरीही अपघातप्रवण क्षेत्रांवर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे वाहतूकमंत्री म्हणाले.
चिखली येथे गांधी जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी वरील माहिती दिली. वाहनचालकांनी बेदरकारपणे वाहन चालविणे टाळावे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी व उपाययोजना
राज्यातील अपघातप्रवण क्षेत्रांची दखल घेत वाहतूक मंत्र्यांनी रस्ता सुरक्षा परिषदेच्या सदस्यांकडून या ठिकाणांची पाहणी करून उपाययोजनांची शिफारस केली जाणार असल्याचे सांगितले. यामध्ये तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असेल.राज्यातील काही धोकादायक ‘ब्लॅक स्पॉट’ दूर करण्यासाठी यापूर्वीच विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. उर्वरित अपघातप्रवण ठिकाणांचाही आढावा घेऊन तेथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिली.
वाहनांचा अतिवेग ठरतोय जीवघेणा
बायणा येथे उड्डाणपुलावर भरधाव दुुचाकीची धडक संरक्षक कठड्याला बसून काल गुरुवारी एका युवक व युवतीचा मृत्यू झाला होता. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. त्यात मुंगुल, वास्को येथील श्रीशल तलवार (२९ वर्षे) आणि आणखी एका युवतीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर भरधाव वाहने चालवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ लागला आहे.
यापूर्वी पर्वरी येथील नूतन उड्डाणपुलावर भरधाव कार चालवल्याने झालेल्या अपघातात दोघांचा बळी गेला होता तर दोघे गंभीर जखमी झाले होते. गोव्यात होणारे जास्तीतजास्त अपघात भरधाव वेग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने होत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करूनच वाहने हाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


