पणजी : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी एक अधिसूचना जारी केली आहे. यानुसार दहा वर्षांपेक्षा अधिक कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित केले जाणार आहे. या अधिसूचनेचे आम्ही स्वागत करतो. मात्र या अधिसूचनेमध्ये पीडब्ल्यूडीकामगार पुरवठा सोसायटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत स्पष्टता नाही. सोसायटी एक प्रकारे स्वायत्त संस्था असल्याने या कर्मचाऱ्यांना देखील अधिसूचनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी ॲड. अजय प्रभुगावकर यांनी केली.
शुक्रवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रभूगावकर म्हणाले की, पीडब्ल्यूडी कामगार पुरवठा सोसायटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आंदोलन १४ एप्रिल रोजी सुरू झाले होते. सरकारने याची दखल घेत दहा वर्षे सेवा केलेल्या अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला. मात्र ज्यांनी आंदोलन सुरू केले होते,
त्या सोसायटीच्या कर्मचाऱ्यांबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. सध्या जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेच्या आधारे तांत्रिकदृष्ट्या सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना नियमित करणे नाकारले जाऊ शकते. असे केल्यास या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे.
ते म्हणाले, आमच्या मागण्यांबाबत आम्ही दोन वेळेस पीडब्ल्यूडी मंत्र्यांना देखील भेटलो. त्यांनी देखील आम्हाला आतपर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काम बंद करून आंदोलन करू नका ही विनंती देखील आम्ही मान्य केली आहे.
मात्र, नवीन आलेल्या अधिसूचनेबाबत स्पष्टता मिळणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही सोमवारी पुन्हा एकदा मंत्र्यांची भेट घेणार आहोत. यावेळी पीडब्ल्यूडी कामगार पुरवठा सोसायटीच्या कंत्राटी कामगारांबाबत स्वतंत्र अधिसूचना काढणे किंवा अन्य पर्यायांवर चर्चा केली जाईल. हा विषय अधिक ताणला जाऊ नये अशीच आमची अपेक्षा आहे.
कामगार पुरवठा सोसायटीचे कर्मचारी मागील दहा ते पंचवीस वर्षे कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. यातील काही जण आता निवृत्तीच्या जवळ पोहोचले आहे. हे कर्मचारी अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम करतात. मात्र त्यांना वेतन व अन्य सुविधा मिळत नाहीत. त्यांना नियमित करून घेतले जात नाही. हा स्थानिक कामगारांवर अन्याय आहे. यामध्ये सुमारे २ हजारहून अधिक कर्मचारी कंत्राटावर काम करत आहेत. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने यातील सुमारे २९१ जणांना कायम करण्याचा आदेश दिला होता. या तत्त्वावर अन्य कर्मचाऱ्यांना कायम करावे अशी आमची मागणी असल्याचे प्रभुगावकर यांनी सांगितले.


