‘भारतीय प्राण घेणारे नाहीत तर वाचविणारे’; पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना कॅप्टन स्मित मच्छार यांना अश्रू अनावर

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानातील घातपाताचा प्रयत्न उधळून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या अतुलनीय शौर्याचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
9 mins ago
‘भारतीय प्राण घेणारे नाहीत तर वाचविणारे’; पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना कॅप्टन स्मित मच्छार यांना अश्रू अनावर

नवी दिल्ली : कर्तव्यनिष्ठेची पराकाष्ठा आणि असीम धैर्याच्या बळावर मृत्यूच्या दारातून १७४ निष्पाप जिवांना सुरक्षित बाहेर काढणाऱ्या एका भारतीय वैमानिकाच्या कौतुकासाठी देशाचे सर्वोच्च नेतृत्व पुढे आले, तेव्हा ते केवळ एक औपचारिक संभाषण राहिले नाही, तर तो दोन भारती्यांमधील भावनाव्यक्त करणारा एक अत्यंत जिव्हाळ्याचा क्षण ठरला. दुबईहून इस्रायलची राजधानी तेल अवीवकडे उड्डाण करणाऱ्या फ्लाईदुबईच्या विमानात ३० सप्टेंबर रोजी घडलेला थरार संपूर्ण जगाला हादरवणारा होता. परंतु, ऐन संकटाच्या क्षणी भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेले अचाट धैर्य आणि प्रसंगावधान यामुळे एका मोठ्या घातपाताचा प्रयत्न उधळला गेला. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूरध्वनीवरून कॅप्टन मच्छार यांच्याशी विशेष संवाद साधत त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव केला.



विमानात सह-वैमानिकाने अचानक केलेल्या हिंसक हल्ल्यामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. गंभीररीत्या जखमी होऊनही कॅप्टन मच्छार यांनी धीर सोडला नाही. १७ वर्षांचा उड्डाणाचा अनुभव आणि ११ वर्षांचा कॅप्टन म्हणून असलेला सराव याच्या जोरावर त्यांनी कॉकपिटमधील बिघडलेली परिस्थिती क्षणात ओळखली. अत्यंत नाजूक स्थितीत त्यांनी विमानाचा दरवाजा उघडून इतर कर्मचाऱ्यांना आत येण्याचा मार्ग मोकळा केला, ज्यामुळे विमानावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. या साहसामुळे फ्लाईदुबईच्या या विमानाचे सौदी अरेबियात सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुरुवातीला सौदी अरेबियामध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमी कॅप्टन मच्छार यांना संयुक्त अरब अमिरातीमधील (युएई) अबू धाबी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युएईतील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी या वैद्यकीय उपचाराच्या प्रवासाची अधिकृत माहिती दिली.

संवादादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन मच्छार यांच्या धैर्याला सलाम करत म्हटले की, संपूर्ण देश त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत असून जागोजागी महामृत्युंजय जप सुरू आहे. ऐन संकटाच्या वेळी घेतलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले. "तुमच्या या शौर्यामुळे आज संपूर्ण देश अत्यंत अभिमानाने सांगू शकतो की, आम्ही भारतीय प्राण घेणारे नाही तर प्राण वाचवणारे लोक आहोत," अशा शब्दांत पंतप्रधानांनी भारताच्या नैतिक मूल्यांची उजळणी केली. शरीरावर गंभीर जखमा झेलून आणि मृत्यूशी थेट झुंज देऊनही स्वतःच्या जिवापेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या या वैमानिकाने १४० कोटी भारतीयांची मान जगभरात उंचावली असल्याचे सांगत पंतप्रधानांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

पंतप्रधानांच्या या आपुलकीच्या शब्दांनी भावूक झालेल्या कॅप्टन स्मित मच्छार यांनी त्या भीषण प्रसंगातील अनुभव कथन केला. हल्ल्यानंतर कॉकपिटमध्ये खाली कोसळल्यानंतरही विमानाचा वेग आणि दिशा ढासळत असल्याचे त्यांच्या अनुभवी नजरेने तात्काळ टिपले होते. जर वेळेत दरवाजा उघडला गेला नसता तर मोठा अनर्थ घडला असता, याची जाणीव त्यांनी व्यक्त केली. अत्यंत कठीण आणि जीवघेण्या प्रसंगात स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी ते सतत 'हनुमान चालीसा' पुटपुटत होते, अशी प्रामाणिक कबुली त्यांनी दिली. देशाच्या पंतप्रधानांकडून मिळालेली ही कौतुकाची थाप आणि आपुलकी यामुळे कॅप्टन मच्छार यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कधी देशाच्या पंतप्रधानांशी असा थेट संवाद साधता येईल अशी कल्पनाही केली नव्हती, असे सांगत त्यांनी पंतप्रधानांचे आणि संपूर्ण देशवासीयांचे मनःपूर्वक आभार मानले.

हेही वाचा
सर्व पहा