पणजी : निवडणूक आयोगाच्या मदतीने गोव्यात मतदार यादीतून विरोधकांची व नागरिकांची नावे वगळण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुटिल डाव असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी केला आहे. गोव्यातील सध्याचे भाजप सरकार आणि त्यांची धोरणे याला जनता पूर्णपणे कंटाळली असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था साफ कोलमडली आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गोव्याची जनता काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी राहील आणि काँग्रेसला निश्चितपणे पूर्ण बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास सचिन पायलट यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाच्या वतीने गोव्यात सध्या 'गोंय राखोण यात्रा' राबवली जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेत सहभागी होण्यासाठी सचिन पायलट गोव्यात आले होते. याप्रसंगी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ नेते युरी आलेमाव, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
देशभरात राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेनंतर ३३ कोटींहून अधिक नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असून, एकट्या गोव्यात तब्बल १ लाख २७ हजार मतदारांची नावे वगळली गेल्याचे पायलट यांनी नमूद केले. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेच्या मदतीने मतदार यादीतील नावे वगळण्याचा प्रयत्न गोव्यातही सरकारकडून केला जात आहे. निवडणूक आयोग असो, विद्यापीठ असो वा इतर कोणतीही संस्था असो, त्यावर बेकायदेशीरपणे ताबा मिळवणे ही भाजपची कार्यपद्धती बनली आहे. आज गोव्यात भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढली असून जमिनीचे गैरकायदेशीर रूपांतरण वेगाने सुरू आहे. यावर नियंत्रण मिळवून जमिनीचा योग्य वापर करण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा आखणे आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी काँग्रेसने सुरू केलेल्या 'गोंय राखोण यात्रे'ला राज्यभरातून मोठा आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. राज्यघटनेत सुधारणा करून मतदारसंघांची फेररचना (डीलिमिटेशन) करण्याच्या हेतूने भारतीय जनता पक्ष इतर राजकीय पक्ष फोडून स्वतःचे संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आगामी निवडणुकीतील पक्षाचे रणनीतिक ध्येय स्पष्ट केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात पराभूत करणे हे आमचे मुख्य लक्ष्य असून, त्यानंतर इतर मंत्र्यांना पराभूत करण्यावर आमचा भर असेल, असा इशारा त्यांनी दिला. तर दुसरीकडे, 'गोंय राखोण यात्रे'चे बॅनर्स आणि पोस्टर काढण्यात आल्याच्या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत विधिमंडळ नेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर जोरदार टीका केली.


