पणजी: गोव्यातील नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चिंबल परिसरात प्रस्तावित युनिटी मॉलचे बांधकाम, ऐतिहासिक तोयार तलावाचा नैसर्गिक प्रवाह वळवण्याचा प्रयत्न आणि ग्रामस्थांची जुनी पारंपरिक पायवाट बंद केल्याच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी एकत्र येत निदर्शने केली. विकासाच्या नावाखाली स्थानिक जलस्रोत आणि पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
या आंदोलनादरम्यान घटनास्थळी एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. आंदोलनासाठी प्रत्यक्ष ठिकाणी केवळ मोजकेच नागरिक उपस्थित असतानाही, पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव चक्क दोन मोठ्या पोलीस बस आणि मोठा फौजफाटा तैनात केला होता. मोजक्याच आंदोलकांसाठी प्रशासनाने एवढी मोठी सुरक्षा व्यवस्था का उभारली, यावरून सोशल मीडियावर तरुण वर्गाकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि या घटनेचे फोटो व व्हिडिओ डिजिटल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
.
गोविंद शिरोडकर म्हणाले, तोयार तलाव हा या परिसरातील जैवविविधतेचा आणि जलसुरक्षेचा मुख्य आधार आहे. तलावाचा नैसर्गिक प्रवाह वळवल्यामुळे भविष्यात पावसाळ्यात पाणी साचून पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, मॉलच्या उभारणीमुळे वर्षानुवर्षे नागरिक वापरत असलेली पारंपरिक पायवाट बंद झाल्याने लोकांची गैरसोय होत आहे.
दुसऱ्या बाजूला, भाजपच्या नवीन कार्यालय उभारणीवरूनही प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शिरोडकर यांनी परिसराची पाहणी करताना आरोप केला की, भाजपच्या नवीन कार्यालयाच्या आणि त्याच्या सीमाभिंतीच्या बांधकामामुळे स्थानिक अधिसूचित तळ्याकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पूर्वी या रस्त्यावरून विद्यार्थी, पर्यावरण अभ्यासक, नागरिक आणि झाडांना पाणी देणारे टँकर सहज जाणे-येणे करत असत. मात्र, आता या रस्त्यावर चिरे, दगड आणि टाकाऊ बांधकाम साहित्य टाकून हा मार्ग अडवण्यात आला आहे.

एकीकडे राज्य सरकार पर्यावरण संवर्धन आणि जलस्रोतांच्या रक्षणाच्या मोठ्या गप्पा मारते, मात्र दुसरीकडे प्रत्यक्ष व्यवहारात नैसर्गिक तलाव आणि पायवाटा बंद केल्या जात आहेत, असा घणाघाती आरोप शिरोडकरांनी आहे. निसर्ग आणि नैसर्गिक मार्ग वाचवण्यासाठी स्थानिकांनी उभारलेला हा लढा आता अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


