मुंबई: भारतीय शेअर बाजारात दररोज कामकाज बंद होताना जाहीर होणाऱ्या अंतिम क्लोजिंग प्राईसकडे सर्वसामान्य गुंतवणूकदार सहसा बारकाईने पाहत नाहीत. परंतु, हीच क्लोजिंग प्राईस म्युच्युअल फंड, ईटीएफ, इंडेक्स फंड आणि वायदे बाजारातील कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांचा पाया मानली जाते. सध्याच्या टप्प्यावर शेअर बाजारात शेवटच्या ३० मिनिटांतील म्हणजेच दुपारी ३.०० ते ३.३० या वेळेतील व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईसवरून (VWAP) बंद भाव निश्चित केला जातो.
मात्र, सत्राच्या शेवटच्या काही मिनिटांत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि मोठे खरेदीदार-विक्रेते मोठ्या प्रमाणात व्यवहार करतात, ज्यामुळे शेअरच्या भावात अचानक मोठी उलथापालथ पाहायला मिळते. ही अनपेक्षित अस्थिरता आणि संभाव्य कृत्रिम फेरफार रोखण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीने (SEBI) क्लोजिंग प्राईस निश्चितीसाठी लिलाव पद्धतीची नवी पारदर्शक प्रणाली आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या नव्या प्रणालीनुसार दररोज दुपारी ३.१५ ते ३.३५ या २० मिनिटांच्या कालावधीत एक विशेष लिलाव सत्र आयोजित केले जाईल. या सत्रादरम्यान खरेदीदार आणि विक्रेते आपापल्या ऑर्डर्स नोंदवतील. ज्या एका ठराविक किमतीवर सर्वाधिक शेअर्सची खरेदी-विक्री होणे शक्य ठरेल, तीच किंमत त्या दिवसाचा अधिकृत क्लोजिंग रेट म्हणून घोषित केली जाईल. यामुळे मागणी आणि पुरवठ्याच्या थेट समीकरणावर आधारित अत्यंत अचूक आणि वास्तववादी भाव निश्चित होण्यास मदत होईल. ही नवीन लिलाव पद्धत टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार असून सुरुवातीच्या टप्प्यात ती केवळ वायदे बाजारात (F&O Segment) उपलब्ध असलेल्या शेअर्ससाठीच अमलात आणली जाईल. त्यानंतर हळूहळू इतर समभागांचा यात समावेश केला जाणार आहे.
सेबीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ईटीएफ, इंडेक्स फंड आणि म्युच्युअल फंडांना होणार आहे. ईटीएफ आणि इंडेक्स फंडांची एकूण कामगिरी पूर्णपणे दिवसाच्या बंद भावावरच अवलंबून असते. लिलाव पद्धतीमुळे शेअर्सचे भाव अधिक स्थिर आणि पारदर्शक राहिल्याने त्यांचा ट्रॅकिंग एरर लक्षणीयरीत्या कमी होईल. शिवाय, वायदे बाजारातील तफावत कमी होण्यासही याची मोठी मदत लाभणार आहे. दुपारी ३.३० वाजता लिलावातून अंतिम बंद भाव निश्चित झाल्यानंतरही वायदे बाजारात दुपारी ३.४० वाजेपर्यंत व्यवहार सुरू राहतील, ज्यामुळे स्पॉट प्राईस आणि फ्युचर्सच्या भावातील फरक कमी होईल. एकूणच, सेबीच्या या निर्णयामुळे शेअर बाजारातील व्यवहार अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनणार आहेत.


