सलग सुट्ट्यांमुळे गोवा पर्यटकांनी फुल्ल !

वाहतूक कोंडीने पर्यटकांसह स्थानिकही त्रस्त : पर्यटन व्यवसायाला मात्र चालना

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
03rd October, 11:02 pm
सलग सुट्ट्यांमुळे गोवा पर्यटकांनी फुल्ल !

पर्यटकांनी गजबजलेला पणजीतील मेरी इमॅक्युलेट चर्चचा परिसर. (कैलास नाईक)

पणजी : गांधी जयंतीनिमित्त शुक्रवारची सुटी, त्यानंतर शनिवार आणि रविवार अशी सलग तीन दिवसांची सुटी मिळाल्याने देशभरातील पर्यटकांनी गोव्याकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांत गोवा पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेला असून, विशेषतः उत्तर गोव्यातील समुद्रकिनारे आणि प्रमुख पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी झाली. मात्र, वाहतूक नियोजनाचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.
सलग तीन दिवसांची सुटी असल्याने गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार, याचा अंदाज सरकारी यंत्रणेला असणे अपेक्षित होते. मात्र, अनेक प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहतूक पोलीस, वॉर्डन किंवा होमगार्डची पुरेशी उपस्थिती दिसली नाही. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यात अडचणी आल्या.पर्यटकांची संख्या मोठी असली तरी बहुतांश रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये अपेक्षेइतकी गर्दी नसल्याचे चित्र दिसले. मात्र, हॉटेल, गेस्ट हाऊस आणि पार्किंगची ठिकाणे मोठ्या प्रमाणात भरली होती. काही व्यावसायिकांनी व्यवसाय चांगला झाल्याचे सांगितले.
टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखीजा यांनी सांगितले की, गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले असून, त्यातील अनेक जण स्वतःची वाहने घेऊन आले आहेत. हॉटेलांमध्ये सुमारे ८० ते ८५ टक्के खोल्या भरल्या आहेत. पर्यटन व्यवसायासाठी हे दिवस चांगले असले तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी मोठी समस्या ठरत आहे.
पर्यटनस्थळांजवळ पार्किंगची गरज
पर्यटकांची वाहने थेट पर्यटनस्थळांवर येऊ नयेत, यासाठी सरकारने पर्यटनस्थळांच्या बाहेर मोठी पार्किंग व्यवस्था उभारावी. तेथून वॉकिंग ट्रॅक किंवा शटल बससेवा सुरू केल्यास वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल, असे सुखीजा यांनी सांगितले. फोंतेन्हास परिसरातील अरुंद रस्त्यांवरही गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता काही ठिकाणी बेकायदेशीर टॅक्सीचालकांकडून मोटारींच्या मागे लागून पर्यटकांची पिळवणूक करण्याचे प्रकारही सुरू असल्याचे दिसून आले.
कळंगुट, बागा, कांदोळी, हणजूणमध्ये गर्दी
शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी उत्तर गोव्यातील कळंगुट, बागा, कांदोळी, हणजूण यांसह प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली. या भागातील रस्तेही वाहनांनी गजबजून गेले होते. पर्यटनस्थळांवरील पार्किंगची ठिकाणे वाहनांनी भरून गेली होती. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
ड्राय डेमुळे मद्यविक्रीवर निर्बंध
गांधी जयंतीनिमित्त शुक्रवारी ड्राय डे असल्याने राज्यातील मद्यविक्रीची दुकाने बंद होती. रेस्टॉरंट सुरू असले तरी मद्यविक्रीवर निर्बंध होते. मात्र, काही ठिकाणी दुकानांच्या मागील दरवाजातून मद्यविक्री सुरू असल्याचे दिसून आले. काही हॉटेलांमध्ये आधीच साठवून ठेवलेले मद्य चढ्या दराने विकले जात असल्याचीही चर्चा होती.

हेही वाचा
सर्व पहा