कृषी अधिकारी उद्यापासून करणार भातशेतीच्या नुकसानीची पाहणी

कृषी संचालक : अहवालानंतर भातपिकाची नेमकी स्थिती होणार स्पष्ट

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
03rd October, 11:09 pm
कृषी अधिकारी उद्यापासून करणार भातशेतीच्या नुकसानीची पाहणी

पणजी : पावसाअभावी गोव्यातील भातशेतीवर झालेल्या परिणामाचा विभागीय कृषी अधिकारी सोमवारपासून प्रत्यक्ष शेतात जाऊन आढावा घेणार आहेत. सोमवार आणि त्यानंतर मंगळवार किंवा बुधवारी हे अधिकारी पाहणी करून आपला अहवाल कृषी खात्याकडे सादर करतील. या अहवालानंतर राज्यातील भातपिकाची नेमकी स्थिती स्पष्ट होईल, अशी माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.
यंदा पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी राहिल्याने गोव्यातील भातशेतीसमोर संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी भातपिकाच्या वाढीवर परिणाम होऊन कापणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच पीक तग धरेल की नाही, अशी चिंता निर्माण झाली आहे.
सध्या राज्यातील भातलागवडीची स्थिती सामान्य असल्याचेही देसाई यांनी सांगितले. पाऊस कमी झाला म्हणून कापणीचा हंगाम पुढे ढकलण्याची शक्यता नाही. भाताच्या लागवड आणि कापणीचे वेळापत्रक निश्चित असते. ठरावीक कालावधीत पीक कापणीसाठी तयार झाल्यानंतर त्याच काळात कापणी करावी लागते. यंदाही दसऱ्यापर्यंत भातकापणीचा हंगाम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
आतापर्यंत ८०.९२ इंच पाऊस
गोव्यात यंदा आतापर्यंत ८०.९२ इंच पावसाची नोंद झाली असून, पावसाची तूट ३१.७ टक्के आहे. सप्टेंबर महिन्यात एकाही दिवशी एक इंचापेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. त्यातच तापमान वाढल्याने काही भागांतील भातरोपांच्या मुळांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.‍
शेतकऱ्यांकडून अद्याप तक्रारी नाहीत
सध्या भातशेतीच्या नुकसानीबाबत कृषी खात्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आलेल्या नाहीत. मात्र, प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतरच नुकसानीची खरी स्थिती समोर येईल, असे देसाई यांनी सांगितले.
ऑक्टोबर महिना सुरू झाल्यामुळे आता यावर्षीच्या पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता कमी आहे. मागील तीन-चार वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी राहिले आहे. यंदा मान्सून उशिरा सुरू झाला. जून महिन्यातही पावसाचे प्रमाण कमी राहिले. आता भाताला कणसे आल्यानंतर पुन्हा पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने चिंता वाढली आहे.
दरम्यान, वेळसाव परिसरात खाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने काही शेतांचे नुकसान झाले. मात्र, राज्यातील इतर भागांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यावेळी आढळून आले नव्हते. आता विभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर भातशेतीची सद्यस्थिती आणि संभाव्य नुकसानीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जुलैपासूनच भातशेतीवर संकट
यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे आगमन उशिरा झाल्याने भातशेतीसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. जूनमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी जुलैमध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतांमधील पाणी आटले. त्यातच वाढलेल्या तापमानामुळे भाताची रोपे आणि बियाण्यांच्या उगवणीवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली.
पावसाअभावी पिके करपण्याची भीती
सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस २३ सप्टेंबर रोजी २९.९ मिलिमीटर इतका नोंदवला गेला. महिन्यात काही दिवस पावसाच्या हलक्या सरी झाल्या; मात्र त्या फार काळ टिकल्या नाहीत. त्यामुळे पावसाची तूट पुन्हा वाढत गेली. काही भागांत पाऊस झाला, तर काही भागांत पावसाने पूर्णपणे हुलकावणी दिली. ज्या भागांत पाऊस झाला नाही, तेथे पिके करपण्याची भीती आहे.


यंदाच्या कमी पावसामुळे गोव्यात भाताचे उत्पादन काही प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता नाही. विभागीय कृषी अधिकाऱ्यांना भातशेतीची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांनी पाहणी केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या अहवालातून पिकाची वास्तविक स्थिती स्पष्ट होईल.

हेही वाचा
सर्व पहा