बेतीत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न जागृत नागरिकाने हाणून पाडला; चोरट्याला रंगेहात पकडले

बेती येथे दुपारी दीडच्या सुमारास खिडकीतून पहिल्या मजल्यावर चढणाऱ्या एका संशयित चोराला स्थानिक नागरिक श्याम फातर्पेकर यांनी प्रसंगावधान राखत रंगेहात पकडून पर्वरी पोलिसांच्या स्वाधीन केले असून तपास सुरू आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
बेतीत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न जागृत नागरिकाने हाणून पाडला; चोरट्याला रंगेहात पकडले

पणजी : पर्वरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील बेती परिसरात आज ३ ऑक्टोबर रोजी दुपारी चोरी प्रयत्न उघडकीस आला आहे. मात्र, एका स्थानिक नागरिकाचे प्रसंगावधान आणि दाखवलेल्या तत्परतेमुळे संशयित चोरट्याला चोरी करण्यात अपयश आले आहे. दुपारी १:३० वाजताच्या सुमारास एका इमारतीच्या खिडकीच्या साहाय्याने पहिल्या मजल्यावर चढून आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात इसमाला स्थानिक रहिवासी श्याम फातर्पेकर यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.   

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बेती येथील रहिवासी श्याम फातर्पेकर हे दुपारी १:३० वाजताच्या सुमारास आपले काम आटोपून घराच्या दिशेने परतत होते. त्या वेळी अचानक त्यांची नजर रस्त्यालगत असलेल्या एका इमारतीवर गेली. एक संशयित व्यक्ती इमारतीच्या खिडकीवरून पहिल्या मजल्याच्या वरच्या भागात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या तत्काळ लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य श्याम फातर्पेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि थेट पुढे जाऊन त्या संशयित इसमाला घट्ट पकडून ठेवले.  

 संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर फातेरपेकर यांनी तात्काळ पर्वरीचे उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्याशी संपर्क साधून घटनेची संपूर्ण माहिती दिली. माहिती मिळताच कर्पे यांच्या सूचनेनुसार पर्वरी पोलीस अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर श्याम फातर्पेकर यांनी पकडून ठेवलेल्या संशयिताला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.  

घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्याम श्याम फातर्पेकर यांनी वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. चोरांचे धाडस इतके वाढले आहे की, आता ते रात्रीच्या अंधाराची वाट न पाहता भरदुपारी घरफोडीचे प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात घडणाऱ्या प्रत्येक संशयित हालचालीबाबत नेहमी सतर्क राहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. अनेकदा इमारतीवर चढणाऱ्या व्यक्तीला लोक रंगकाम किंवा दुरुस्ती करणारा कामगार समजून दुर्लक्ष करतात; परंतु अशा हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांची हीच जनजागृती अशा गुन्हेगारी घटनांना आळा घालू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या पर्वरी पोलीस संशयित आरोपीची पार्श्वभूमी आणि त्याचा पूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा कसून तपास करत आहेत.   

हेही वाचा
सर्व पहा