बागा येथे पत्रकारावर हल्ला : पर्यटकांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; पर्यटनमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

बागा किनाऱ्यावर पर्यटकांना बेकायदेशीर दलालांपासून सावध करणाऱ्या पत्रकार समीप नार्वेकर यांच्यावर एका दलालाने हल्ला केला. या घटनेचा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी कडक शब्दांत निषेध करत पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
बागा येथे पत्रकारावर हल्ला : पर्यटकांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; पर्यटनमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

पणजी: गोव्यातील कळंगूट किनारपट्टीवर फिरणाऱ्या टाउट्पासून पर्यटकांना सावध करणारे पत्रकार समीप नार्वेकर यांच्यावर एका दलालाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर गोवाभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकारावरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून, पर्यटन क्षेत्राची प्रतिमा मलीन करणाऱ्या अशा बेकायदेशीर दलालांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११.५४ च्या सुमारास ही घटना बागा बीच येथील पार्किंग परिसरात घडली. लॉन्ग वीकेंडच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची होणारी गर्दी आणि किनारपट्टी भागातील स्थितीची पाहणी करून वृत्त संकलित करण्यासाठी समीप नार्वेकर बागा बीच परिसरात गेले होते. ते एका मित्राच्या रेस्टॉरंटजवळ उभे असताना, तेथे एका कारमध्ये बसलेल्या पर्यटकांना एक दलाल जाळ्यात ओढण्याचा आणि त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे नार्वेकर यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केल्यानंतर संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला गालबोट लावणारे आणि पर्यटकांसह स्थानिक माध्यम प्रतिनिधींना त्रास देणारे बेकायदेशीर दलाल व एजंट कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. पत्रकारांवर होणारे हल्ले हे अतिशय निंदनीय आहेत. अशा समाजकंटकांवर पोलीस आणि पर्यटन खात्याने संयुक्तपणे धडक कारवाई केली पाहिजे. कळंगूट आणि बागा किनारपट्टीवर पर्यटकांना अमली पदार्थ, बेकायदेशीर सेवा आणि रात्रीच्या क्लब्सच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या दलालांचे जाळे वाढले आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने किनारपट्टीवर विशेष गस्त वाढवावी आणि अशा बेकायदेशीर दलालांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी पर्यटन व्यावसायिक व स्थानिक पत्रकारांकडून केली जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा