मायणा-कुडतरीत न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासून धिरयोचे आयोजन

मायणा कुडतरी येथील हंडी खुरीस परिसरात बेकायदेशीररीत्या रेड्यांच्या झुंजीचे आयोजन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मायणा कुडतरी पोलिसांनी अज्ञात आयोजकांविरोधात पशुकूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
मायणा-कुडतरीत न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासून धिरयोचे आयोजन

मडगाव : गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट बंदी घातलेली असतानाही दक्षिण गोव्यात बेकायदेशीररीत्या रेड्यांच्या झुंजीचे (धिरयो) आयोजन करण्याचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. मायणा कुडतरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाखण-हंडी खुरीस परिसरातील एका खुल्या मैदानात बेकायदेशीररीत्या धिरयो आयोजित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आणि खासगी वृत्तवाहिन्यांवरून बातमी प्रसारित झाल्यानंतर मायणा कुडतरी पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत अज्ञात आयोजकांविरोधात रीतसर गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मायणा कुडतरी येथील जाखण हंडी खुरीस परिसरातील मोकळ्या जागेत या बेकायदेशीर धिरयोचे आयोजन करण्यात आले होते. या झुंजी पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. धिरयो पार पडल्यानंतर या थरारक झुंजीचे चित्रीकरण काही उपस्थितांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आणि ते विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले. वृत्तवाहिन्यांवरून बातमी समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ हरकतीत आली.

मायणा कुडतरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. या बेकायदेशीर कृत्याप्रकरणी पोलिसांनी प्राण्यांविरुद्ध क्रूरता प्रतिबंधक कायद्यातील (Prevention of Cruelty to Animals Act) विविध कलमांनुसार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून मुक्या प्राण्यांना यांसारख्या धोकादायक झुंजीत ढकलणाऱ्या आणि पैज लावणाऱ्यांचा पोलीस आता शोध घेत आहेत.

सध्या मायणा कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर कामत या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत. व्हिडिओ फुटेजच्या आधारे धिरयोचे आयोजन करणारे मुख्य सूत्रधार, रेड्यांचे मालक आणि या प्रकारास प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. किनारपट्टी व ग्रामीण भागात अशा बेकायदेशीर धिरयो भरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


हेही वाचा
सर्व पहा