म्हापशात ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्र्यांनी ऐकल्या नागरिकांच्या समस्या; राज्य सरकारने प्रशासन थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणे आणि गतिमान व पारदर्शक कारभार देण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत म्हापसामध्ये ‘सेवा सेतू संगम - सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा अत्यंत उत्तम प्रतिसाद लाभला.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
40 mins ago

म्हापसा : राज्य सरकारने प्रशासन थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणे आणि गतिमान व पारदर्शक कारभार देण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत म्हापसामध्ये ‘सेवा सेतू संगम - सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा अत्यंत उत्तम प्रतिसाद लाभला.

शनिवारी बोडगिणी, म्हापसा येथील प्रगती सभागृहात बार्देश तालुकास्तरीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह जलस्रोत मंत्री नीळकंठ हळर्णकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार डिलायला लोबो आणि आमदार मायकल लोबो उपस्थित होते. दरम्यान, पर्यटनमंत्री रोहन खंवटे व आमदार केदार नाईक या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले.

मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांशी थेट संवाद

सकाळी १०.३० ते दुपारी १२.४५ वा. या वेळेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टोकन सिस्टीमच्या माध्यमातून सुमारे १५० ते २०० नागरिकांशी थेट भेट घेतली. यावेळी पाणी आणि वीज बिल, रस्ते, गटारे, नगरपालिकेची कामे, बाजारपेठेतील प्रलंबित प्रश्न, उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालयाशी संबंधित विषय तसेच ‘माझे घर’ योजनेतील म्युटेशन व प्रशासकीय कामकाजासंबंधीच्या अडचणी नागरिकांकडून ‘वन-टू-वन’ जाणून घेण्यात आल्या.

तसेच, बार्देश तालुक्यातील विविध पंचायतींचे पंच सदस्य, सामाजिक संघटना आणि एनजीओच्या प्रतिनिधींनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन परिसरातील विकासकामांबाबत चर्चा केली. नागरिकांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित विविध सरकारी खात्यांच्या प्रमुखांसोबत स्वतंत्र बैठक घेतली. लोकांच्या अर्जांवर त्वरित कार्यवाही करून त्यांच्या समस्या जागेवरच निकाली काढण्याचे सक्त आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवणार

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या एका महिन्याच्या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जात आहे. या अंतर्गत ‘सरकार तुमच्या दारी’ या संकल्पनेतून आम्ही थेट लोकांपर्यंत पोहोचत आहोत. साखळीनंतर बार्देश तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे. प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारात पोहोचवून शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

हेही वाचा
सर्व पहा