मडगाव: उत्तर गोव्यात काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'गोवा राखण यात्रे'ला सर्वसामान्य नागरिकांकडून अपेक्षेपेक्षा अत्यंत उत्तम आणि उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ही यात्रा सुरू झाल्यापासून सत्ताधारी भाजपकडून काँग्रेसवर सातत्याने टीका केली जात असून यात्रेत अडथळे निर्माण करण्याचे विविध प्रयत्न झाले. मात्र, या सर्व प्रकारांमधूनच ही यात्रा अत्यंत यशस्वी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले.
मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत 'गोवा राखण यात्रे'च्या यशाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या वेळी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस नेत्या अंजली निंबाळकर, कार्याध्यक्ष एम. के. शेख आणि आमदार एल्टन डिकॉस्टा आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत माहिती देताना गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, यात्रेच्या प्रचार व प्रसारासाठी लावलेले काँग्रेसचे बॅनर आणि होर्डिंग्ज फाडण्याचे गैरप्रकार घडले. इतकेच नव्हे तर भाजपच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून यात्रेत पाठवून विघ्न आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि जागृत गोमंतकीय जनतेने या यात्रेला दिलेला पाठिंबा पाहता सत्ताधाऱ्यांचे सर्व डावपेच निष्फळ ठरले आहेत.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या वेळी पक्षाच्या धोरणाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. भूतकाळात काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्या कोणत्याही नेत्याला पुन्हा पक्षात घेतले जाणार नाही, असा ठाम निर्णय पक्षाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेच्या जनादेशाचा अवमान करणाऱ्या आणि देवाची शपथ घेऊन विश्वासघात करणाऱ्या नेत्यांना गोव्याची जनता कधीही माफ करणार नाही. आगामी निवडणुकीत काँग्रेसचे २७ उमेदवार निवडून येतील आणि राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होऊन जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण केले जाईल. काँग्रेसने कधीही जाती-धर्मावर राजकारण केले नसून भाजपच्या फूट पाडणाऱ्या राजकारणाला जनता बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की, राज्यातील भाजप सरकार गोव्याचे मूळ अस्तित्व धोक्यात आणत आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि महिला सुरक्षा या सर्वच क्षेत्रांत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. उत्तर गोव्यात काँग्रेसला १२ ते १३ जागांवर विजय निश्चित मिळणार असून सत्तरी आणि साखळी मतदारसंघांतील जनताही आता बदलासाठी उत्सुक आहे. काँग्रेस नेते सी. वेणुगोपाल आणि सचिन पायलट यांनी या यात्रेत सहभाग घेतला असून आगामी काळात पक्षाचे इतर राष्ट्रीय नेतेही या यात्रेत सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


