पणजी: घटनात्मक मूल्ये आणि समकालीन कायदेशीर आव्हानांवर विचारमंथन करण्यासाठी ऑल इंडिया लॉयर्स युनियनच्या (AILU) गोवा शाखेच्या ५ व्या राज्य अधिवेशनाचे आयोजन मिरामार येथील व्ही. एम. साळगावकर कॉलेज ऑफ लॉ येथे करण्यात आले. या अधिवेशनात कायदे क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ वकील आणि संविधान अभ्यासकांनी विविध महत्त्वाच्या कायदेशीर विषयांवर आपले विचार मांडले.
अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करताना कायदेतज्ज्ञांनी न्यायव्यवस्था, नागरी हक्क, धर्मनिरपेक्षता आणि कायद्याचे राज्य यांसारख्या मूलभूत घटकांवर प्रकाश टाकला. बदलत्या सामाजिक आणि कायदेशीर परिस्थितीत घटनात्मक मूल्यांचे जतन आणि संरक्षण करण्याची गरज वक्त्यांनी विशेष रूपाने अधोरेखित केली.
या अधिवेशनाला AILU गोवा राज्य शाखेचे अध्यक्ष ॲड. व्हिक्टर सॅव्हिओ ब्रागांका यांच्यासह ॲड. हर्षा नाईक, ॲड. सेलेरिना डी’सा, ॲड. अनिल कुमार चौहान, ॲड. क्लिओफात कुतिन्हो, ॲड. प्रसेनजीत ढगे आणि ॲड. निकोलस डी’मेलो आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
वकील, कायद्याचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांसोबतच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांच्या दृष्टीनेही या अधिवेशनातील चर्चेचे विषय अत्यंत अभ्यासपूर्ण आणि दिशादर्शक ठरले. सध्याच्या काळात घटनात्मक मूल्ये टिकवून ठेवणे आणि कायदेशीर आव्हानांवर व्यापक जनजागृती घडवून आणणे हाच या अधिवेशनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.


