गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर एका ११ वर्षांच्या मुलीवर शनिवारी लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पणजी पोलिसांनी जीवन लक्ष्मण ओली (२२, मूळ नेपाळ) या संशयिताला अटक केली आहे. त्याला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी शनिवारी दुपारी मिरामार येथून करंझाळे येथे किनाऱ्यामार्गे नातेवाईकांकडे जात होती. त्यावेळी पीडितेला संशयिताने निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याच स्थितीत घाबरलेल्या अवस्थेत ती नातेवाईकाच्या घरी गेली. तिने नातेवाईकाला घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी पोलीस निरीक्षण कक्षाला संपर्क साधून वरील घटनेची माहिती दिली. पणजीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपिका परमार यांनी अज्ञाताविरोधात भारतीय न्याय संहिता, गोवा बाल कायदा आणि बाल लैंगिक शोषणविरोधी कायद्याच्या (पोक्सो) विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला.
उत्तर गोवा अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर आणि उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर, नितीन नाईक, महेश नाईक, काॅन्स्टेबल इर्मिया गुरैया बालभद्र, सुरेश नाईक, प्रसन्ना मंगेशकर, शुभम मांद्रेकर, राजेश लोटलीकर आणि चालक विकास नाईक व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. मिरामार ते करंझाळे किनाऱ्यावर संशयिताचा शोध घेतला. संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्यांनी चौकशी केली. त्यानेच पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. पोलिसांनी पीडितेकडून मिळालेल्या माहितीवरून संशयित जीवन ओली याला अटक केली. वैद्यकीय चाचणी करून रविवारी पोलीस कोठडीसाठी त्याला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. उपनिरीक्षक दीपिका परमार पुढील तपास करत आहेत.
समुद्र किनाऱ्यांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
संशयित जीवन ओली नेपाळचा असून करंझाळे किनाऱ्यावर कामगार म्हणून काम करत आहे. तिथेच तो वास्तव्य करत आहे. वरील घटना भरदिवसा घडल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


