कमी पावसामुळे राज्यातील ३० टक्के शेतीला फटका शक्य

गोव्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने शेतीची स्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यातील जवळपास ३० टक्के शेती डोंगराळ (मरड) भागात असून, या शेतीला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. नुकसानीचा अचूक अंदाज पाहणीनंतरच स्पष्ट होईल. सोमवारपासून प्रत्यक्ष पाहणी सुरू होणार असून, आठवडाभरात त्याचा अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती कृषी खात्याचे संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.


04th October, 11:53 pm
कमी पावसामुळे राज्यातील ३० टक्के शेतीला फटका शक्य

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
गोव्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने शेतीची स्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यातील जवळपास ३० टक्के शेती डोंगराळ (मरड) भागात असून, या शेतीला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. नुकसानीचा अचूक अंदाज पाहणीनंतरच स्पष्ट होईल. सोमवारपासून प्रत्यक्ष पाहणी सुरू होणार असून, आठवडाभरात त्याचा अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती कृषी खात्याचे संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.
राज्यातील शेते दूरदूर आणि वेगवेगळ्या दुर्गम भागात पसरलेली असल्याने पाहणीच्या कामाला काहीसा वेळ लागण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय शेतीच्या नुकसानीचा अचूक अंदाज लावणे शक्य होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. काणकोण, सांगे आणि केपे भागात पाऊस समाधानकारक झाला असला, तरी पेडणे, म्हापसा आणि मुरगाव भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. ज्या भागात पावसाच्या सरी कोसळल्या, तिथे जमिनीत काही प्रमाणात ओलावा आहे. मात्र, जेथे पाऊस पडला नाही, तेथील पिके सुकण्याची भीती निर्माण झाली आहे. डोंगराळ भागातील मातीत ओलावा उरलेला नाही. तसेच ओढे किंवा पाटाच्या पाण्याचा थंडपणाही नाही. ही शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने ज्या डोंगराळ भागात पाऊस पडला नाही, तेथील शेती सुकू लागली आहे.
तापमान वाढल्याने रोपांची मुळे करपली
सप्टेंबर संपून ऑक्टोबर सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. शनिवारी संध्याकाळी काही ठिकाणी पाऊस झाला, मात्र त्याचे प्रमाण नगण्य होते. येत्या काही दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हा पाऊस पडल्यास शेतात ओलावा निर्माण होण्यास मदत होईल. सप्टेंबरमध्ये एकाही दिवशी १ इंचापेक्षा जास्त पाऊस पडला नाही. त्यातच कडक ऊन पडत असल्याने तापमान वाढू लागले आहे, परिणामी रोपांची मुळे करपू लागली आहेत. रविवारी कमाल तापमान ३३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच तापमान वाढल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे.
पावसाची सरासरी ३१ टक्क्यांनी घटली
गोव्यात यंदा आतापर्यंत केवळ ८२ इंच मोसमी पाऊस पडला आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी आहे. सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर २३ सप्टेंबर रोजी सर्वाधिक २९.९ मिमी पावसाची नोंद झाली. सप्टेंबरमध्ये पाऊस फक्त रिमझिम पडला, मात्र तो जास्त काळ टिकला नाही. पाऊस नसल्यामुळे कडक उन्हाबरोबर तापमान वाढत आहे. गेल्या तीन-चार वर्षांत पावसाचे प्रमाण जास्त होते, परंतु यंदा ते कमालीचे घटले आहे. यंदा मान्सूनचे आगमनही उशिरा झाले आणि जून महिना कोरडाच गेला.
दुबार पेरणीचे संकट अन् हवामानाचा लहरीपणा
यंदा सुरुवातीला लावणीनंतर पाऊस न पडल्याने रोपे वाया गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यापूर्वीच्या वर्षांत अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होत असे. गोव्यात मोसमी पावसाचे प्रमाण १२० इंचांपेक्षा जास्त असायचे आणि शेतात पाणी साचून पिके कुजायची. मात्र, यंदा परिस्थिती अगदी उलट आहे. भाताचे पीक आल्यानंतर जास्त पावसाची गरज नसते, पण रोपे टवटवीत राहण्यासाठी अधूनमधून पावसाच्या हलक्या सरींची आवश्यकता असते. आता भाताची कणसे लागली असताना पाऊस गायब झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अद्याप शेतकऱ्यांकडून नुकसानीची तक्रार आलेली नाही. सोमवारपासून सुरू होणाऱ्या पाहणीनंतर खरी परिस्थिती समोर येईल.      

हेही वाचा
सर्व पहा