गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
लैंगिक अत्याचार प्रकरण हे केवळ आरोप निश्चित करण्याच्या प्राथमिक टप्प्यावर आहे. या टप्प्यावर पीडितेचे म्हणणे सत्य गृहीत धरणे आवश्यक आहे. या प्रकरणातील संशयित आणि पीडित अविवाहित असून पीडितेने सुरुवातीला विरोध केला आणि लग्नाच्या आश्वासनाला बळी पडून संबंध ठेवल्याचे स्पष्ट होत आहे, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित पुष्पेन्दर राठी या व्यावसायिक बॉक्सरच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला. हा आदेश पाॅक्सो न्यायालयाचे न्यायाधीश डाॅ. पूजा कवळेकर यांनी दिला.
या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, २१ वर्षीय पीडित युवतीने २०२३ मध्ये तक्रार दाखल केली. युवती १९ वर्षाची असताना संशयित राठीची २०२१ मध्ये पणजी येथे एका क्रीडा स्पर्धेत ओळख झाली होती. त्यांच्यात सोशल मीडियावरून मैत्री झाली. ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. २०२३ मध्ये आरोपीने लग्नास नकार दिला. संशयिताने तिच्याकडून वेगवेगळ्या प्रसंगी ७५,००० रुपये उकळल्याचा आरोपही तक्रारीत आहे. याची दखल घेऊन पणजी महिला पोलीस स्थानकाचे तत्कालीन उपनिरीक्षक हर्षल नाईक यांनी जून २०२३ मध्ये संशयित राठीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणी पणजी येथील पाॅक्सो न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. संशयिताच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ देत संबंध परस्पर संमतीने झाल्याचा दावा करून संशयिताला आरोपमुक्त करण्याची मागणी न्यायालयात केली. न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयिताची मागणी फेटाळून लावली. आरोप निश्चित करून खटल्याला सामोरे जाण्याचा निर्देश जारी केला.
संशयिताला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक
संशयित पुष्पेंदर राठीने २०२२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्याला एक कांस्यपदक मिळाले होते. त्याबद्दल त्याला राज्य सरकारने १ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. याशिवाय, राज्यातील विविध स्पर्धांत भाग त्याने पदके मिळवली आहेत.


