‘आप’-काँग्रेसमध्ये कलगीतुरा : भाजप विरोधकांचे ऐक्य कागदावरच

भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत वारंवार व्यक्त केले जात असले, तरी त्यांच्यातील ऐक्याचा अभाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसची ‘गोवा राखण यात्रा’ सुरू असतानाच आता काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामुळे विरोधी पक्षांमध्ये बिघाडीच स्पष्टपणे दिसत आहे.


04th October, 11:48 pm
‘आप’-काँग्रेसमध्ये कलगीतुरा : भाजप विरोधकांचे ऐक्य कागदावरच

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत वारंवार व्यक्त केले जात असले, तरी त्यांच्यातील ऐक्याचा अभाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसची ‘गोवा राखण यात्रा’ सुरू असतानाच आता काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामुळे विरोधी पक्षांमध्ये बिघाडीच स्पष्टपणे दिसत आहे.
‘कचोरी में दो समोसा, काँग्रेस का क्या भरोसा...’ अशी खोचक टीका ‘आप’ने काँग्रेसवर केली आहे. या टीकेला काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकार यांनी प्रत्युत्तर दिले. ‘केंद्रात आणि गोव्यात भाजप सत्तेवर आहे. मात्र, ‘आप’ भाजपवर टीका न करता काँग्रेसवरच सातत्याने चिखलफेक करत आहे. यावरून त्यांचा हेतू स्पष्ट होतो. गोव्यात ‘आप’ आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात आघाडी झाली असली, तरी ‘काँग्रेसवर काय भरोसा ?’ म्हणणाऱ्या ‘आप’वर गोवा फॉरवर्ड पक्षाचा तरी भरोसा आहे का ?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पुढील पाऊल टाकत ‘आप’ने ‘३ इडियट्स’ संकल्पनेवर डिजिटल पोस्टर जारी करून काँग्रेस आणि भाजप पक्षांवर निशाणा साधला आहे. या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘व्होट चोर’, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा ‘आमदार चोर’ तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकार यांचा ‘होलसेलर’ असा उल्लेख करून ‘आप’ने हे पोस्टर ट्विटरवर पोस्ट केले आहे. या वादामुळे आता काँग्रेस आणि ‘आप’मधील दरी आणखी रुंदावली आहे.


आम्ही वेळ वाया घालवणार नाही : गिरीश चोडणकर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, ‘आप’च्या कार्यकर्त्यांना त्यांचे नेते सांगतात तसे काम करावे लागते. काँग्रेसवर टीका करण्याचे काम सध्या त्यांना देण्यात आले आहे. त्यांच्या कामात मी अडथळा आणणार नाही. ‘आप’ काँग्रेसला आपला मुख्य शत्रू मानतो आणि सातत्याने टीका करतो. अशा टीकांना उत्तरे देण्यात आम्ही वेळ वाया घालवणार नाही. आमचा भर संघटना बांधणी आणि जनसंपर्कावर आहे.
सातत्याने होणाऱ्या टीकेवरून विरोधकांच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह
काही दिवसांपूर्वी ‘आप’ आणि गोवा फॉरवर्ड यांनी ‘गोवा फर्स्ट’ आघाडीची घोषणा केली. त्यावेळी ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली होती. त्यानंतरही विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसने व्यक्त केले होते. गोवा फॉरवर्डनेही समविचारी पक्षांसोबत युतीची तयारी दर्शवली होती. त्यामुळे विरोधकांच्या ऐक्याची चिन्हे दिसत होती. मात्र, आता पुन्हा सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे विरोधकांच्या महाआघाडीवर संशयाचे ढग जमा झाले आहेत.

हेही वाचा
सर्व पहा