पणजी : गुन्ह्यांतील पीडित महिला, बालकांना न्यायालयीन प्रक्रियेसाठी ये-जा करताना होणारा त्रास कमी करण्यासाठी वाहतूक मंत्री माॅविन गुदिन्हो यांनी अनोखा पुढाकार घेतला आहे. महिला, बालकांना न्यायालयात ने-आण करण्यासाठी गोवा माईल्स टॅक्सी ॲप आणि ‘स्कॅन गो’ स्वयंसेवी संस्थेमध्ये सामंजस्य करार (एमओयू Memorandum of Understanding (MoU) करण्यात आला आहे.
या करारानुसार, विशेषतः गोव्यातील दुर्गम ग्रामीण भागातील गुन्ह्यांतील पीडित महिला आणि बालकांना न्यायालयात जाण्यासाठी गोवा माईल्सकडून मोफत टॅक्सी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सेवेदरम्यान पीडितांची ओळख आणि प्रकरणाशी संबंधित माहितीची पूर्ण गोपनीयता राखली जाणार आहे.
मंत्री गुदिन्हो यांनी हा कराार देशातील अशा प्रकारचा एकमेव आणि अनोखा उपक्रम असल्याचे सांगितले. न्याय मिळविण्याच्या प्रक्रियेत वाहतुकीची अडचण पीडितांसाठी अडथळा ठरू नये, यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः दुर्गम गावांमध्ये राहणाऱ्या पीडितांना न्यायालयापर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी केलेल्या प्रयत्नांचेही गुदिन्हो यांनी कौतुक केले. पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत विविध यंत्रणांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिला व बालकांसाठी सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि गोपनीय वाहतूक उपलब्ध करून देणारा हा उपक्रम न्यायालयीन प्रक्रियेत पीडितांचा सहभाग सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


