वाळपई : वाळपई–होंडा मार्गावरील रेडीघाट येथे काल रात्री उशिरा दुचाकीला झालेल्या स्वयंअपघातात २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक दुचाकीवरून वाळपईहून आपल्या होंडा येथील निवासस्थानी येत होता. रेडीघाट येथे त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.
अपघात वाढले; नियम पाळण्याचे आवाहन
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जीवघेणे अपघात वाढत आहेत. बायणा येथे उड्डाणपुलावर भरधाव दुचाकीचा अपघात होऊन युवक व युवतीचा मृत्यू झाला. कोलवाळ येथे शनिवारी स्कॉर्पिओची धडक ‘रेन्ट अ बाईक’ स्कूटरला बसून झालेल्या अपघातात आकांक्षा कल्पेश बन्साली जैन (३६ वर्षे, रा. ठाणे, मुंबई) ही महिला ठार झाली. तिचा पती व मुलगी जखमी झाली.
वाढत्या अपघातांच्या मागे नियम धाब्यावर बसवून किंवा अतिवेगाने वाहन चालवणे हेच कारण असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी नियमांचे पालन करून व वेगावण नियंत्रण ठेवून वाहन चालवून स्वत:बरोबर इतरांचाही जीव वाचवावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.


