पर्रा येथे हीट अॅण्ड रन अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी

अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
04th October, 11:55 pm
पर्रा येथे हीट अॅण्ड रन अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी

म्हापसा : ब्रिटोवाडा, पर्रा येथे हीट अॅण्ड रन अपघातात कारगाडीने दुचाकीला धडक दिल्याने दोघे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. या अपघातास कारणीभूत अज्ञात कार चालकाविरुद्ध म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातात दुचाकीस्वार महंमद कलीम मणिहार (४२, रा. कोलवाळ) व आयुब इद्रिशी (३९, रा. ब्रिटोवाडो, पर्रा) हे दोघेही जखमी झाले. गंभीर जखमी दुचाकी चालक महंमद मणिहार याच्यावर गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत.
हा अपघात शनिवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास घडला. हडफडे नागवा ते म्हापसाच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या अज्ञात कारने वाटेत घटनास्थळी चुकीच्या बाजूने जाऊन समोरून येणाऱ्या अॅक्टिव्हा स्कुटरला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाले. अपघातानंतर जखमींना वैद्यकीय मदत न पुरवता किंवा पोलिसांना माहिती न देता संबंधित अज्ञात कार चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. नंतर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनस्वारांनी जखमींना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारार्थ दाखल केले.
या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४(अ), १३४(ब) अंतर्गत भरधाव व निष्काळजीपणे वाहन हाकून अपघात घडवण्यासह घटनास्थळावरून पळ काढल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पंचनामा पोलीस हवालदार समीर मुनांकर यांनी केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.