छताची कौले सरकवून अज्ञात व्यक्तीचा घरात प्रवेश

शांतीनगर-भुईपाल येथे आई-मुलगी झोपेत असताना पहाटेची घटना

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
6 hours ago
छताची कौले सरकवून अज्ञात व्यक्तीचा घरात प्रवेश

संशयिताने घरामध्ये प्रवेश करण्यासाठी काढलेली छप्पराची कौले. 

वाळपई : सत्तरी तालुक्यातील होंडा परिसरातील शांतीनगर-भुईपाल येथे पहाटेच्या सुमारास घराच्या छतावरील कौले सरकवून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई आणि मुलगी घरातील खोलीत झोपलेल्या असताना हा प्रकार घडल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. घरात प्रवेश केलेल्या व्यक्तीने चोरी करण्यासह छेडछाडीचा प्रयत्न केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी शीतल सतीश तारी, रा. शांतीनगर, भुईपाल, होंडा-सत्तरी यांनी १ ऑक्टोबर रोजी वाळपई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. अज्ञात व्यक्तीने घरात अनधिकृत प्रवेश केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, संबंधित व्यक्तीची ओळख पटवून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही घटना पहाटे सुमारे ५ च्या सुमारास घडली. शीतल तारी आणि त्यांची मुलगी घरातील खोलीत झोपलेल्या असताना अचानक काही आवाज आल्याने त्यांना जाग आली. त्यावेळी घरात एक अनोळखी व्यक्ती असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित व्यक्तीने घराच्या छतावरील कौले सरकवून घरात प्रवेश केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
अनोळखी व्यक्ती घरात असल्याचे लक्षात येताच तक्रारदार महिलेने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण दिसल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तीने तेथून पळ काढला. तक्रारदार आणि त्यांच्या मुलीने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो पसार होण्यात यशस्वी झाला.
संबंधित व्यक्ती स्थलांतरित कामगारासारखी दिसत असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, त्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याची ओळख पटवावी आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने केली आहे.
पोलिसांकडून गुन्हा नोंद न झाल्याचा दावा
लेखी तक्रार देऊनही या प्रकरणी अद्याप दखलपात्र गुन्ह्याची नोंद झालेली नसल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. गुन्हा नोंद केल्यास पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी न्यायालयात जावे लागेल आणि त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागू शकतो, अशी भूमिका पोलिसांकडून व्यक्त करण्यात आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.