कला अकादमी परिसरात चालत्या कारवर झाड कोसळले; चालक थोडक्यात बचावला

पर्यावरण कार्यकर्त्यांचा धोकादायक झाडे कापण्यात अडथळा : महापौर रोहित मोन्सेरात; पणजी येथील कला अकादमी परिसरात चालत्या कारवर सोमवारी सकाळी झाड कोसळण्याची घटना घडली. या घटनेत कारचालक सुदैवाने सुखरूप बचावला. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले. सकाळी रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ सुरू असताना रस्त्यावर झाड कोसळले. एकूण स्थिती पाहता मोठी दुर्घटना टळल्याची माहिती झाड कोसळताना पाहिलेल्या काहीजणांनी दिली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
कला अकादमी परिसरात चालत्या कारवर झाड कोसळले; चालक थोडक्यात बचावला

पणजी : येथील कला अकादमी परिसरात चालत्या कारवर सोमवारी सकाळी झाड कोसळण्याची घटना घडली. या घटनेत कारचालक सुदैवाने सुखरूप बचावला. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले. सकाळी रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ सुरू असताना रस्त्यावर झाड कोसळले. एकूण स्थिती पाहता मोठी दुर्घटना टळल्याची माहिती झाड कोसळताना पाहिलेल्या काहीजणांनी दिली. 


आज सकाळी वरील झाड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. पणजी अग्नीशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीला मोकळा केला. पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. आणि आवश्यक सूचना केल्या.


झाड पडण्याच्या घटनेसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता; महापौर मोन्सेरात यांनी सांगितले की, पणजी महापालिका अनेकवेळा धोकादायक झाडे कापण्याची व फांद्या छाटण्याची मोहीम हाती घेत असते. मात्र, यावेळी पर्यावरण कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी येऊन अडथळा आणत असून, झाडे कापण्यास विरोध करीत असतात. झाड कोसळून लोकांच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग येतो किंवा मालमत्तेची हानी होते; त्यावेळी ते फिरकत नसल्याचे मोन्सेरात म्हणाले.

यापुढे पणजी शहरातील धोकादायक झाडे कापण्याची, फांद्या छाटण्याचे काम पुन्हा हाती घेण्यात येणार आहे. आणि त्या अनुषंगाने कर्मचारी, कामगारांना आवश्यक सूचना करण्यात आल्या असल्याचे रोहित मोन्सेरात यांनी सांगितले. मात्र, पर्यावरण कार्यकर्त्यांनी येऊन त्यात अडथळा निर्माण करू नये असा इशाराही दिला.


दरम्यान, पणजीतील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी पणजीत मोठे झाड सुरक्षारक्षकाच्या बूथवर पडून सुरक्षारक्षक ठार झाला होता. त्यामुळे धोकादायक झाडांचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची मागणी जोर धरत आहे. 

हेही वाचा
सर्व पहा