पणजी: राज्य सरकार लवकरच एआय धोरण जाहीर करणार आहे. याद्वारे राज्यातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना २०३० पर्यंत या क्षेत्रात प्रशिक्षित केले जाईल. या विद्यार्थ्यांमध्ये एआय संबंधित आवश्यक कौशल्ये विकसित केली जातील. त्यामुळे असे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून एआय क्षेत्रात नोकरी अथवा व्यवसाय सहजपणे करू शकतील अशी माहिती आयटी मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
सोमवारी तिसवाडी ब्लॉक साठी आयोजित सेवा संकल्प या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. खंवटे यांनी सांगितले की, आज सर्वच क्षेत्रात एआयचा वापर वाढत आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी ही कला आत्मसात करून घेणे आवश्यक असल्याचे आमचे मत आहे. एआय टूल्सचा शिक्षण अथवा अन्य माहिती घेण्यासाठी वापर करावा.
मात्र स्वतःच्या बुद्धीचा वापर करणे देखील तेवढेच आवश्यक आहे. गोव्यातील तरुण विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता , क्षमता, प्रतिभा आहे. याचा वापर स्टार्टअप क्षेत्रासाठी करावा. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे. स्टार्ट अप साठी लागणारी सर्व मदत गोवा सरकार करत आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
ते म्हणाले, सध्या गोव्यात सुमारे ८४६ स्टार्टअपची नोंद आहे. यातील सुमारे ५० टक्के स्टार्ट अप हे महिलांचे आहेत. आपल्या आयुष्यातील आपल्या समाजातील छोट्या छोट्या समस्या समजून घ्याव्यात. स्टार्टअपच्या माध्यमातून या समस्यांवर उपाययोजना कराव्यात. आवश्यक तिथे आधुनिक तंत्रज्ञान एआयची मदत घ्यावी.
या क्षेत्रात येण्यासाठी सातत्य असणे आवश्यक असते. एकदा अपयश आले म्हणून खचून न जाता सतत प्रयत्न करणे गरजेचे असते. देशातील प्रसिद्ध स्टार्ट अपचा सुरुवातीचा काळ कठीण होता. मात्र त्यांनी या समस्येवर मात करून आज जगभरात आपले नाव कमावले आहे.


