‘माय गोव्ह गोवा’ पोर्टलवरील माहिती कोकणीत होणार उपलब्ध

जनता आणि सरकार यातील दुरावा कमी करणे, जन भागीदारी या संकल्पनेनुसार प्रशासनात नागरिकांचा सहभाग वाढवणे या कारणांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘माय गोव्ह गोवा’ पोर्टलवरील सामग्री लवकरच कोकणीमध्ये उपलब्ध होणार आहे. याबाबत सांख्यिकी खात्याने पात्र एजन्सीकडून प्रस्ताव मागवले आहेत.


3 hours ago
‘माय गोव्ह गोवा’ पोर्टलवरील माहिती कोकणीत होणार उपलब्ध

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
जनता आणि सरकार यातील दुरावा कमी करणे, जन भागीदारी या संकल्पनेनुसार प्रशासनात नागरिकांचा सहभाग वाढवणे या कारणांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘माय गोव्ह गोवा’ पोर्टलवरील सामग्री लवकरच कोकणीमध्ये उपलब्ध होणार आहे. याबाबत सांख्यिकी खात्याने पात्र एजन्सीकडून प्रस्ताव मागवले आहेत. पोर्टलवरील सामाग्री इंग्रजीसह रोमी आणि देवनागरी कोकणीमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. अधिकाधिक लोक या पोर्टलशी जोडले जावेत यासाठी स्थानिक भाषेतील कंटेंट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश ‘विकसित गोवा २०३७’ साठी ‘माय गोव्ह गोवा’ प्लॅटफॉर्मवरील आधीच नोंदणीकृत ५ लाखांहून अधिक नागरिकांना पुन्हा सक्रिय करणे, तरुण व पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या नागरिकांचा सहभाग वाढवणे हा आहे. यासाठी ‘आमचे गोवा, आमचे स्वप्न’ ही मुख्य संकल्पना असणार आहे. याशिवाय या पोर्टलमध्ये नवे बदल केले जाणार आहेत. पात्र एजन्सीला पोर्टलचे संचालन, व्यवस्थापन करणे, तसेच त्याच्याशी संबंधित डिजिटल आणि ऑन-ग्राऊंड मोहिमा राबवाव्या लागतील. निवड झालेल्या एजन्सी नागरिकांकडून येणाऱ्या कल्पनांचे संकलन व वर्गीकरण करून त्या दरमहा संबंधित सरकारी विभागांकडे पाठवण्याचे काम करेल. याबाबत झालेल्या बदलांची माहिती सार्वजनिक पद्धतीने उपलब्ध करून देईल. नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि सेवांची सोप्या भाषेत माहिती देऊन ‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेअंतर्गत शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवणे, रील्स, क्विझ, खेळ, पॉडकास्ट आणि कॉलेज कॅम्पसमधील उपक्रमांच्या माध्यमातून नागरी सहभाग हा तरुणांच्या दैनंदिन संस्कृतीचा भाग बनवणे आदी कामे एजन्सी करणार आहे.
‘माय गोव्ह गोवा’ला प्रशासनावरील अधिकृत व विश्वासार्ह माहितीचे केंद्र बनवणे आणि अपप्रचाराला आळा घालणे. सरकारला नागरिकांचे अभिप्राय आणि डेटा विश्लेषणाद्वारे दरमहा अहवाल सादर करणे. कंत्राट संपल्यानंतरही वापरता येतील असे सरकारी मालकीचे प्लॅटफॉर्म्स आणि कंटेंट लायब्ररी करणे आदी कामे एजन्सी करेल. एजन्सी पायाभूत सुविधा, पर्यटन, ब्ल्यू इकॉनॉमी आणि एआय यांसारख्या १२ विषयांअंंतर्गत पोल, क्विझ, संकल्प आणि ए आय कोर्स यांसारख्या मॉड्यूलचे संपादन व व्यवस्थापन करणार आहे.
एजन्सी नागरिकांच्या प्रश्नांना देणार उत्तर
एजन्सी इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, एक्स (ट्विटर), लिंक्डइन आणि व्हॉट्सअॅप चॅनेल या अधिकृत हँडल्सचे व्यवस्थापन करण्याचे, तसेच या माध्यमांच्या द्वारे नागरिकांच्या प्रश्नांना दिलेल्या मुदतीत उत्तरे देण्याचे कामही करणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा