कळंगुटमधील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मुंबईत शोध

फूस लावणाऱ्या पश्चिम बंगालच्या युवकाला नोटीस

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
05th October, 11:50 pm
कळंगुटमधील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मुंबईत शोध

म्हापसा : कळंगुट येथील एका नामांकित विद्यालयातून २९ सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा कळंगुट पोलिसांनी मुंबईत शोध लावला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुलीला सुरक्षितपणे गोव्यात आणण्यात आले. तिच्यासोबत असलेल्या पश्चिम बंगालमधील युवकाला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.

तांत्रिक माहितीच्या आधारे तपास
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कळंगुट पोलिसांनी गुन्हा नोंदवून तांत्रिक माहिती व गुप्तचरांच्या मदतीने तपास सुरू केला. मुलगी पश्चिम बंगालमधील युवकाच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले. दोघे मुंबईत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले.

मुलीचा जबाब नोंदविला
प्राथमिक चौकशीत मुलीने स्वतःच्या इच्छेने गोवा सोडल्याचे सांगितले. प्रथम पश्चिम बंगाल आणि त्यानंतर मुंबईला गेल्याचे तिने स्पष्ट केले. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नाईक करीत आहेत.

युवकाची चौकशी सुरू
दरम्यान, मुलगी आणि संबंधित युवक मुंबईपर्यंत कसे पोहोचले, यासह त्यांच्या प्रवासादरम्यान कोणाची मदत झाली का, याबाबतही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. युवकाला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्याच्या जबाबाच्या आधारे प्रकरणातील पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे.