म्हापसा : बर्च बाय रोमिओ लेन क्लबला मद्यविक्री परवाना मिळवण्यासाठी कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी संशयित सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्या जामीन अर्जावर सोमवारी म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात सुनावणी झाली. यावरील अंतिम युक्तिवाद ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.सोमवारी सुनावणीवेळी क्लबचे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता हे तिघेही न्यायालयात उपस्थित होते. लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली. दरम्यान, अजय गुप्ता यांनीही जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर सरकारी पक्षाचे म्हणणे व अंतिम युक्तिवादासाठी १३ ऑक्टोबर तारीख निश्चित करण्यात आली आहे.
६ डिसेंबर २०२५ रोजी बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये भीषण आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर पोलीस तपासादरम्यान क्लबला मद्यविक्रीसाठी उत्पादन शुल्क परवाना मिळवताना कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचा बनावट ना-हरकत दाखला सादर केल्याचे समोर आले. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशन रेडकर यांच्या तक्रारीवरून १७ डिसेंबर २०२५ रोजी म्हापसा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदविला.
२,३०६ पानी आरोपपत्र दाखल
पोलिसांनी जुलै २०२६ मध्ये जीएस हॉस्पिटॅलिटी एलएलपीचे अधिकृत मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा व अजय गुप्ता, क्लब अधिकारी दिनेश खेरा आणि गोवा अबकारी खात्याचे वरिष्ठ कारकून गौरेश गावस अशा पाच जणांविरोधात सुमारे २,३०६ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात ५० साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे.


