फोंडा : खांडेपार परिसरात एका टिप्पर ट्रकचा अपघात होऊन रस्त्यावरच उलटल्याची घटना घडली. त्यात चालक जखमी झाला असून, त्याला आयडी इस्पीतळात उपचारासाठी नेण्यात आले. अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवाहू टिप्पर ट्रक उसगावहून म्हार्दोळच्या दिशेने जात होता. खांडेपार येथे पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटला व आतील माल खाली विखुरला गेला. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक पूर्णपणे रोखली गेली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलीसही दाखल झाले. दुसरा ट्रक आणून रस्त्यावर विखुरला गेलेला अपघातग्रस्त ट्रकमधील माल नेण्यात येणार आहे. ट्रक बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे घटनास्थळी असलेल्या वाहतूक पोलिसांनी सांगितले. अपघात नेमका कसा घडला याचा शोध पोलीस घेत आहेत.


