फोंडा : बेतोडा पंचायत क्षेत्रातील बोणबाग आणि तळेवाडा गावातील लोकांनी एकत्रित येऊन शेतीच्या दोन्ही बाजूनी तयार केलेल्या प्लॉटविरोधात दोन पंचांच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशारा दिल्यानंतर बुधवारी दुपारी काम बंद ठेवण्यात आले. त्याचबरोबर स्थानिक पंच सदस्य दिनेश गावकर यांनी आपण लोकांसोबत असल्याचे स्पष्ट केल्याने सध्या शेतकरी व ग्रामस्थांच्या विरोधाला बळ आले आहे. काम बंद केल्याने गुरुवारी दोन पंचांच्या घरावर मोर्चा नेण्याचे ग्रामस्थांनी स्थगित केले आहे.
शेतीच्या बाजूला प्लॉट करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. त्यामुळे मंगळवारी संध्याकाळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन दोन पंच सदस्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. मात्र, बुधवारी दुपारी प्लॉट जवळ सुरू असलेले काम बंद केल्याने ग्रामस्थांनी गुरुवारी मोर्चा नेण्याचा निर्णय स्थगित केला आहे. मात्र, संध्याकाळी बोणबाग आणि तळेवाडा गावातील लोकांनी शेती राखून ठेवण्यासाठी गडादेवचार आणि उकडाम आजोबाला गऱ्हाणे घातले. शेतीजवळ प्लॉट करणाऱ्यांना सद्बुद्धी देण्याची प्रार्थना यावेळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली.
पंच सदस्य उमेश गावडे म्हणाले, बुधवारी प्लॉटजवळ सुरू असलेले काम बंद ठेवण्यात आले असल्याने गुरुवारी दोन पंचांच्या घराजवळ नेण्यात येणारा मोर्चा स्थगित ठेवण्यात आला आहे. तसेच पुढील काही दिवसांत फोंडा तालुक्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्रामस्थ व शेतकरी शेती राखून ठेवण्यासाठी दोन्ही बाजूनी सुरू असलेले प्लॉट जवळील काम बंद करण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले.
सदर जागेवर हॉस्पिटल उभारण्याच्या प्रस्तावाला पंचायत मंडळाने परवानगी दिली होती. पण शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांचा विरोध असल्याने आपण त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ग्रामस्थ व प्लॉट करणाऱ्या मालकांची बैठक घेऊन आवश्यक तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पंच सदस्य दिनेश गावकर यांनी सांगितले.


