पणजी : गोमंतकीय खाद्यपदार्थांमधील एक प्रमुख घटक म्हणजे कोकम. गोव्यात कोकम उत्पादनात मोठी भर पडली असून, गेल्या तीन वर्षांत दरवर्षी कोकमाच्या लागवडीत एक हेक्टर तर उत्पादनात दरवर्षी ५ टनांची वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती कृषी संचालनालयाने दिली आहे.
गोव्याच्या जेवणाचा मुख्य घटक म्हणजे आमसुल. माशांचे असो वा शाकाहारी जेवण, आमसुल असल्याशिवाय जेवणाला योग्य ती चव येत नाही. जशी गोव्यात कोकमाची मागणी वाढत आहे, तशीच स्थानिक शेतकऱ्यांकडून त्यांचे उत्पादनही वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत २८८ हेक्टर जमिनीवर तब्बल २,४७९ टन कोकमाचे उत्पादन झाले. वर्षभरात सरासरी ९० हेक्टर जमिनीत सरासरी ८०० टन इतके उत्पादन घेतले जाते.
गेल्या तीन वर्षांचा हिशोब पाहता, लागवडीखालील क्षेत्रात दरवर्षी एक हेक्टरची वाढ होत असून, उत्पादनात दरवर्षी ५ टनांची वाढ नोंदवली जात आहे. कोकमाच्या उत्पादनात आणि लागवडीत सातत्याने होत असलेली ही वाढ गोव्याच्या शेतीसाठी एक अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे मानले जात आहे.



