गृहनिर्माण मंडळाकडून फ्लॅट, दुकानांचा होणार लिलाव

डिचोली, पर्वरी, सांकवाळ येथे फ्लॅट, दुकाने

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
2 hours ago
गृहनिर्माण मंडळाकडून फ्लॅट, दुकानांचा होणार लिलाव

पणजी : गोवा गृहनिर्माण मंडळाकडून डिचोली, पर्वरी आणि सांकवाळ येथे उपलब्ध असलेल्या फ्लॅट्स तसेच दुकानांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. या लिलावासाठी इच्छुकांना ऑनलाइन पद्धतीने ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत. विविध इमारतींमध्ये हे फ्लॅट्स आणि दुकाने उपलब्ध आहेत.

डिचोली-बोर्डे येथे ‘ब’ श्रेणीच्या इमारतीत १०, तर ‘अ’ श्रेणीच्या इमारतीत ६ फ्लॅट्स उपलब्ध आहेत. या फ्लॅट्सचे क्षेत्रफळ ७० ते ९८ चौरस मीटर असून, त्यांचा मूळ दर ४० हजार रुपये प्रति चौरस मीटर आहे. अर्जदारांना १ लाख रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या व्यक्तींनाच लिलावात सहभागी होता येणार आहे.

पर्वरी येथे तीन वेगवेगळ्या इमारतींमधील ६ फ्लॅट्सची विक्री करण्यात येणार आहे. प्रत्येक फ्लॅटचे क्षेत्रफळ ९८ चौरस मीटर असून, मूळ दर ४८,९७८ रुपये प्रति चौरस मीटर आहे. यासाठी १ लाख रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार असून, वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

सांकवाळ येथे चार इमारतींमधील २३ फ्लॅट्स उपलब्ध आहेत. या फ्लॅट्सचा मूळ दर ५४ हजार रुपये प्रति चौरस मीटर आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी १ लाख रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. तसेच अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

डिचोली-बोर्डे येथे विविध इमारतींमधील १२ दुकानांचीही विक्री करण्यात येणार आहे. या दुकानांचा मूळ दर १ लाख रुपये प्रति चौरस मीटर असून, त्यांचे क्षेत्रफळ १७ ते ३० चौरस मीटर आहे. यासाठी अडीच लाख रुपये अनामत रक्कम जमा करणे आवश्यक आहे. तसेच वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या अर्जदारांनाच लिलावात सहभागी होता येणार आहे.

पर्वरी मार्केट संकुलातील ११ दुकानांचीही विक्री करण्यात येणार आहे. या दुकानांचे क्षेत्रफळ २५ ते २८ चौरस मीटर असून, त्यासाठी अडीच लाख रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या अर्जदारांनाच लिलावात सहभागी होता येईल. या ई-लिलावासाठी मंडळाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.


हेही वाचा
सर्व पहा