बोणबाग, तळेवाडातील इमारतींचे काम बंद न केल्यास पंचांच्या घरावर मोर्चा!

ग्रामस्थांचा इशारा : पंचायतीला बुधवारी सायंकाळपर्यंत मुदत

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
29th September, 11:35 pm
बोणबाग, तळेवाडातील इमारतींचे काम बंद न केल्यास पंचांच्या घरावर मोर्चा!

फोंडा : बेतोडा पंचायत क्षेत्रातील बोणबाग आणि तळेवाडा गावातील लोकांनी एकत्रित येऊन शेतीच्या दोन्ही बाजूंनी तयार केलेल्या प्लॉटविरोधात चर्चा केली. बुधवारी संध्याकाळपर्यंत प्लॉट जवळ सुरू असलेले काम बंद न केल्यास परवानगी देणाऱ्या सूचक व अनुमोदक म्हणून सही केलेल्या पंच सदस्याच्या घरावर गुरुवारी मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे.

बोणबाग व तळेवाडा गावातील लोकांच्या शेताच्या दोन्ही बाजूनी प्लॉट तयार करून मोठ्या इमारती उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी ग्रामस्थांच्या सह्या घेऊन पंचायतीला याबाबत परवानगी न देण्यासाठी निवेदन दिले होते. परंतु, शेतकऱ्यांच्या निवेदनाला कचऱ्याची टोपली दाखवून पंचायतीने प्लॉट करण्यासाठी परवानगी दिल्याने संतप्त झालेल्या लोकांनी मंगळवारी संध्याकाळी एकत्रित येऊन बैठक घेतली. त्यापूर्वी सकाळी शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार तथा सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांना निवेदन देऊन सुरू असलेले काम बंद करण्याची विनंती केली होती. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्थानिक सरपंचाला फोनवरून काम बंद करण्याचा आदेश देण्याचे सुचविले होते. तरीसुद्धा संध्याकाळी उशिरापर्यंत काम सुरू असल्याने स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

स्थानिक आमदार तथा सहकार मंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर पंचायत मंडळाने काम बंद करण्याची गरज होती. पण मंगळवारी दिवसभर काम सुरू राहिल्याने यावर्षी शेती नष्ट होण्याची अधिक शक्यता आहे. बुधवारपर्यंत काम बंद न केल्यास ग्रामस्थ दोन पंच सदस्यांच्या घराजवळ मोर्चा नेणार असल्याचे श्याम गावडे यांनी सांगितले.

अन्यथा गुरुवारी मोर्चा

बुधवारी संध्याकाळपर्यंत सुरू असलेले काम बंद न केल्यास गुरुवारी सकाळी पंच सदस्याच्या घरावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामस्थांचा विरोध डावलून पंचायतीच्या दोन पंच सदस्यांनी मंडळाच्या बैठकीत काम करण्यासाठी ठराव घेतला होता. त्या दोन पंच सदस्यांच्या घराजवळ गुरुवारी सकाळी मोर्चा नेण्यात येणार जगन्नाथ गावडे यांनी सांगितले. 

हेही वाचा
सर्व पहा