पणजी : गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने सरकारी मालकीच्या भंगार झालेल्या ५९ वाहनांचा लिलाव करण्यास सुरुवात केली आहे. ही वाहने भंगारात काढण्यासाठी लिलाव करण्यात येणार असून, सर्वाधिक बोली लावणाऱ्यास संबंधित वाहने मिळणार आहेत. यात कार, ट्रक, टँकर, दुचाकी आदी वाहनांचा समावेश आहे.
या ५९ वाहनांपैकी आरोग्य सेवा संचालनालयाची १४, गोवा औद्योगिक विकास महामंडळाची ९, सार्वजनिक बांधकाम खात्याची ७, अग्निशमन दल आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची प्रत्येकी ६, पंचायत खात्याची ३, वास्तुशास्त्र महाविद्यालयाची २ वाहने आहेत. तसेच लघु बचत व लॉटरी संचालनालय, जलस्रोत खाते, खादी व ग्रामोद्योग, सरकारी पॉलिटेक्निक, गोवा मनोरंजन संस्था, वजन व माप खाते, पोलीस खाते, नियोजन व सांख्यिकी खाते, गोवा विधानसभा, कोकणी अकादमी, कृषी उत्पादन मंडळ आणि एनआरआय आयुक्त यांच्या प्रत्येकी एका वाहनाचा समावेश आहे.
या वाहनांमध्ये २ जीप, २ रोड रोलर, २ इनोव्हा, ६ पाण्याचे टँकर, ६ रुग्णवाहिका यांसह इतर लहान-मोठ्या मोटारी आणि दुचाकींचा समावेश आहे.
या ५९ वाहनांचे वाटप २३ लॉटमध्ये करण्यात आले आहे. इच्छुकांना कोणत्याही एका किंवा त्यापेक्षा अधिक लॉटसाठी बोली लावता येणार आहे. सर्वाधिक बोली लावणाऱ्यास संबंधित लॉटमधील वाहने मिळतील.
या सर्व वाहनांचा लिलाव ६ ऑक्टोबर रोजी साळगाव येथील गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या आवारात होणार आहे. लिलावात यशस्वी ठरणाऱ्या व्यक्तींना वाहने ज्या स्थितीत आहेत त्याच स्थितीत, कोणतीही तक्रार न करता स्वीकारावी लागणार आहेत.


