पणजी : वेर्णा, लाटंबार्से, किटला आणि वेर्णा संशोधन पार्क येथील एकूण ४० भूखंडांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. या ई-लिलावातून गोवा औद्योगिक विकास महामंडळाला (आयडीसी) सुमारे २०० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. इच्छुकांना ई-लिलाव पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.
वेर्णा औद्योगिक वसाहतीतील १७ भूखंडांचा ई-लिलाव होणार आहे. या भूखंडांचे क्षेत्रफळ २ हजार ते ८० हजार चौरस मीटर इतके आहे. सर्व भूखंडांसाठी ५,७०० रुपये प्रति चौरस मीटर हा मूळ दर निश्चित करण्यात आला आहे. बोली सादर करण्याची अंतिम मुदत २८ ऑक्टोबर असून, २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत ई-लिलाव होईल. या सर्व भूखंडांमध्ये वेर्णा येथील भूखंडांचा मूळ दर सर्वाधिक आहे.
नव्याने सुरू झालेल्या लाटंबार्से औद्योगिक वसाहतीतील १४ भूखंडांचा लिलाव करण्यात येणार आहे. या भूखंडांचे क्षेत्रफळ ५०० ते २,५०० चौरस मीटर आहे. त्यांचा मूळ दर ४,५०० रुपये प्रति चौरस मीटर आहे. बोली सादर करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर असून, २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी ई-लिलाव होणार आहे.
किटला औद्योगिक वसाहतीतील १६ भूखंडांचा ई-लिलाव होणार असून, त्यांचे क्षेत्रफळ १,४०० ते २,२०० चौरस मीटर आहे. या भूखंडांचा मूळ दर ४,००० रुपये प्रति चौरस मीटर आहे. बोली सादर करण्याची अंतिम मुदत ६ नोव्हेंबर २०२६ असून, ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी ई-लिलाव होईल.
वेर्णा संशोधन पार्कमध्ये ३ भूखंड लिलावासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. या भूखंडांचे क्षेत्रफळ २,९०० ते २५,००० चौरस मीटर आहे. त्यांचा मूळ दर ४,००० रुपये प्रति चौरस मीटर आहे. बोली सादर करण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबर असून, २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ई-लिलाव होणार आहे.
लिलाव पारदर्शक पद्धतीने होणार
आयडीसीच्या भूखंडांना उद्योजकांकडून मोठी मागणी आहे. लिलावाची प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार असल्याचे आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले.


