पणजी : आगशी पोलीस स्थानक हद्दितून अपहरण केलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची आगशी पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने सुटका केली. याप्रकरणी संशयित मोहम्मद अरबाज (२० वर्षे) याला बिहारमधून अटक करून गोव्यात आणण्यात आले.
वरीलप्रकरणी यावर्षीच्या ११ ऑगस्ट रोजी आगशी पोलीसस्थानकात दाखल झालेल्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला होता. पोलीस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीनुसार गोवा वेल्हा, तिसवाडी येथे अज्ञात व्यक्तीने आपल्या १५ वर्षीय मुलीला पळवून नेल्याची तक्रार पालकांनी केली होती.
तपासादरम्यान मुलगी आणि संशयित बिहारमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर एलपीएसआय दीपिका पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक बिहारला रवाना झाले. पथकाने बेगुसराय येथील रिफायनरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून स्थानिक पोलिसांची मदत घेत संशयिताच्या हालचालींवर लक्ष ठेवले.
अखेर नूरपूर, बेगुसराय येथे संशयित व मुलगी असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. नंतर पोलिसांनी मुलीला शोधून काढले तर मोहम्मद अरबाज याला अटक केली. त्यानंतर ट्रान्सफर वॉरंटद्वारे त्याला गोव्यात आणण्यात आले. आणि पुढील प्रक्रिया केली. तपास पथकात उपनिरीक्षक दीपिका पवार यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल दीप संतोष परवार, राजू अत्तर आणि एलपीसी संतोषी कळंगुटकर यांचा समावेश होता.


